
खुडी येथे वृद्धाकडून ९५ हजाराची दारू जप्त
खुडी येथे वृद्धाकडून
९५ हजाराची दारू जप्त
देवगड, ता. १४ ः ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने खुडी (ता.देवगड) येथे छापा टाकून सुमारे ९५ हजाराची गोवा बनावटीची दारू पकडली. याप्रकरणी एका वृद्धावर कारवाईचा बडगा उगारला. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाला खुडी येथे एकाकडे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक एस. सी. आगा, उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार आर. जी. जामसंडेकर, काँस्टेबल रवी इंगळे, पोलिस नाईक एस. एस. खाडये आदींनी आज दुपारी छापा टाकला. संशयिताच्या घराच्या मागील भागात ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे २० बॉक्स ताब्यात घेतले. यामध्ये चार बॉक्समध्ये १९ हजार २०० रुपये किंमतीच्या १९२ बाटल्या, अन्य सात बॉक्समध्ये ३३ हजार ६०० रुपये किंमतीच्या १९२ बाटल्या, इतर सहा बॉक्समध्ये २३ हजार ८०० रुपये किंमतीच्या २८८ बाटल्या, आणखी दोन बॉक्समध्ये ९ हजार ६०० रुपये किंमतीच्या ४८ बाटल्या, तर अन्य एका बॉक्समध्ये ८ हजार ८०० रुपये किंमतीच्या ४४ दारूच्या बाटल्या सापडल्या.