
शिक्षणासह कलाक्षेत्रातही यश मिळवा
75628
सरंबळ ः ‘ज्ञानदीप’ हस्तलिखिताचे प्रकाशन करताना संस्थेचे राजेंद्र परब, रणजित देसाई, जयप्रकाश गावडे, विवेकानंद बालम, अनिल होळकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
शिक्षणासह कलाक्षेत्रातही यश मिळवा
रणजित देसाई ः सरंबळ इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कुडाळ, ता. १५ ः शिक्षणासह कलाक्षेत्रही महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ते ज्या क्षेत्रात वाटचाल करतील, तिथे जाण्याची संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी सरंबळ येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.
सरंबळ ग्रामस्थ समता संघ (मुंबई) संचालित सरंबळ इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. पारितोषिक वितरण व विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगतदार झाला. पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (ता. १२) पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरंबळ ग्रामस्थ समता संघाचे शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे होते. प्रमुख पाहुणे गुरुनाथ देसाई, मुख्याध्यापक अनिल होळकर, शाखा चिटणीस प्रसाद साटम, संस्था शाखा खजिनदार जयेंद्र तळेकर, सरंबळ ग्रामपंचायत सरपंच रावजी कदम, उपसरपंच तथा संस्था शाखा सदस्य सागर परब, प्रताप गोसावी, माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा संध्या मुंडले आदी उपस्थित होते. या प्रसंगी शाळेतील विविध स्पर्धांमध्ये कौशल्य दाखविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यावरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी परिश्रम, कलागुण, प्रामाणिकपणा याविषयी मार्गदर्शन करून नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वाचन स्नेहा शिरसाट व आर्या होळकर यांनी केले. विविध गुणदर्शन कार्यक्रम १३ ला झाला. नियोजित अध्यक्ष रामचंद्र राऊत यांच्यातर्फे संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र परब यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य देसाई, कृष्णा धुरी उपस्थित होते. संस्था शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे सीईओ विवेकानंद बालम, मुख्याध्यापक अनिल होळकर, संस्था शाखा चिटणीस प्रसाद साटम, शाखा खजिनदार जयेंद्र तळेकर, शाखा सदस्य प्रताप गोसावी, सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, माजी विद्यार्थी मंडळाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ देसाई, सोनवडे सरपंच पूर्वी धुरी, महिपाल धुरी उपस्थित होते. यावेळी पहिली ते दहावीपर्यंतच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी केदार टेमकर याने काढलेल्या रांगोळीचे विशेष कौतुक झाले. पारितोषिक वाचन व अहवाल वाचन स्नेहा शिरसाट यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांचे प्रास्ताविक मुख्याध्यापक होळकर यांनी, सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले. आभार प्रदर्शन सतप्रसाद परब यांनी केले. यावेळी कलाप्रदर्शनात विद्यार्थ्यांची चित्रे, कलाशिक्षक किशोर चव्हाण यांची पेंटिंग तसेच केदार टेमकर यांची वॉटर कलर पेंटिंग व साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
--
मनोगते अन् गुणगौरव
विवेकानंद बालम यांनी संस्थेच्या कार्याचे, बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे स्वरुप मांडले. आपल्या भाषणात त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन, आशावादी व ध्येयवादी राहून स्वतःवर प्रेम करा, असे आवाहन केले. राजेंद्र परब यानी राधारंग फाउंडेशन व विज्ञान प्रदर्शनात यश मिळविलेले विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सतप्रसाद परब, भरत चौधरी यांचे अभिनंदन केले. समाजात निर्माण होणाऱ्या संधींचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. इमारतीच्या छप्पर दुरुस्तीसाठी उभारलेल्या निधीचा त्यांनी उल्लेख केला.