साडवली-सह्याद्रीच्या कडेकपारीत रंगला देवांचा विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-सह्याद्रीच्या कडेकपारीत रंगला देवांचा विवाह सोहळा
साडवली-सह्याद्रीच्या कडेकपारीत रंगला देवांचा विवाह सोहळा

साडवली-सह्याद्रीच्या कडेकपारीत रंगला देवांचा विवाह सोहळा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat15p25.jpg-KOP23L75796
देवरूख ः मार्लेश्वर येथे श्रीदेव मार्लेश्वर आणि श्री देवी गिरीजादेवीच्या विवाहाचा क्षण.
------------

सह्याद्रीत रंगला देवांचा विवाह सोहळा
श्री मार्लेश्वर-श्री देवी गिरीजादेवी; भाविकांची गर्दी, सनई, चौघड्यांचे मंजूळ सूर
साडवली, ता. १५ : आली लग्न घटी समीप नवरा,.. गंगा, सिंधू, सरस्वतीच यमुना, अशा मंगलाष्टकांनी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव चि. मार्लेश्वर व साखरपाची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा कल्याण विधी सोहळा (विवाह) रविवारी (ता.१५) दुपारी एक वाजून पाच मिनिटाच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात झाला. सनई, चौघड्यांचे मंजूळ सूर मार्लेश्वर तीर्थक्षेत्री घुमत होते. विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित भाविकांनी हरहर महादेव, हरहर मार्लेश्वर हा शिवहराचा जयघोष करीत सह्याद्री पर्वत रांगा दणाणून सोडल्या.
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे.
मकरसंक्राती दिनी श्री देव मार्लेश्वर शिखरावर लाखो भाविकांच्या साक्षीने हिंदू लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार रविवारी दुपारी हा कल्याणविधी सोहळा झाला. या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवस अगोदर मार्लेश्वर नगरीत सुरू होती. मार्लेश्वराची पालखी, गिरीजा देवीची पालखी व यजमान व्याडेश्वराची पालखीचे रविवारी सकाळी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वराडी मंडळींसह आगमन झाल्यानंतर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान आधी विवाह सोहळ्यापूर्वीचे प्रथेपरंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडले. यानंतर विवाह सोहळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी तब्बल, ३६० मानकरी यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले.
मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाह सोहळ्याला सुरवात झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आंगवलीतील अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन, तर लांजेकर स्वामी गिरीजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. यावेळी शास्त्रानुसार पंच कलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी विवाह सोहळा दुपारी एक वाजून पाच मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थित झाला. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी हा परमेश्वराचा अभूतपूर्व विवाह सोहळा डोळ्यात साठवला.
विवाह सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, देवरूखचे पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, रत्नागिरीच्या निरीक्षक निशा जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे श्री. शहा आदींच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवरूख आगराच्या वतीने दिवसभर एसटी फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या.