कुडाळमध्ये पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
कुडाळमध्ये पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
सहविचार सभा ः शहरासह विविध समस्यांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथील पोलिस ठाण्यातर्फे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पदाधिकाऱ्यांशी ठाणे अंमलदार शंकर चिंदरकर व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
या चर्चेत शहरात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पदपथ बांधलेले नाहीत. आठवडा बाजार व सणासुदीच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा भाजी, फळे विक्रेते, फेरीवाले आपली दुकाने मांडून बसतात. शिवाय वाहनांची सतत ये-जा असते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना रस्त्यावर चालणे धोकादायक ठरते. यासाठी आरएसएन हॉटेल ते पंचायत समिती आणि कुडाळ हायस्कूल ते पंचायत समितीपर्यंत पदपथ बांधण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठांकडून करण्यात आली. आरएसएन् हॉटेलसमोर महामार्ग ते कुडाळ बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर विशिष्ट रचनेमुळे ते अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. महामार्ग बांधल्यापासून तेथे झालेल्या अपघातांत सुमारे चार जणांना जीव गमवावा लागला, तर पाच-सहा जण जायबंदी झाले आहेत. याची दखल घेऊन तेथे सुरक्षा व्यवस्था करण्याबाबत महामार्ग ठेकेदाराला आदेश द्यावेत. पोलिस ठाण्यात अनेक लोक आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी येतात किंवा काही जणांना ठाण्यात बोलावले जाते. त्यावेळी लॅपटॉपवर जाबजबाब नोंदवून घेऊन त्याच्या हार्ड कॉपीवर सही घेतली जाते. लेखी जबाब पत्रावरील अक्षरे इतकी लहान असतात की, ज्येष्ठ नागरिकांना ती स्पष्ट दिसत नाहीत. जबाब प्रिंट करताना शब्द रचना किंवा वाक्य रचना चुकीची झालेली असल्यास प्रकरण न्याय प्रविष्ट बनल्यानंतर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वयोवृध्दांना सहज वाचता येईल, असा मोठ्या अक्षरांचा फॉन्ट असावा. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी रिक्षाचे भाडे मीटरप्रमाणे आकारले जात नाही. रात्री-अपरात्री जे प्रवासी रेल्वेने येतात, त्यांना मालवण, वेंगुर्ले, माणगाव, कडावल इत्यादी दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी दामदुप्पट भाडे घेतले जाते. म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळवून रिक्षा भाड्याचे दर ठरवून द्यावेत किंवा मीटरप्रमाणे भाडे आकारले जावे, अशी मागणी करण्यात आली. या सहविचार सभेला ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोरगावकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत अणावकर, उपाध्यक्ष शरद कांबळी, सचिव विठोबा शिरसाट, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम वाढोकार, ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर आंबेकर, आर. आर. दळवी, चंद्रकांत अणावकर, आबा केसरकर, प. तु. तेंडुलकर यांसह इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
.................
चौकट
पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे
रस्त्यावर वाहन चालविताना डाव्या बाजूने चालवावे हा वाहतुकीचा नियम आहे; पण पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालावे, असा कोणताही नियम नाही. याबाबत मार्गदर्शन करताना रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालणे अधिक सुरक्षित असते. म्हणून ज्येष्ठांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, अशी नवीन आणि महत्त्वाची माहिती यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.