
झाड जपणार वाढदिवसाची आठवण
75951
केर-भेकुर्ली ः ग्रामपंचायत कार्यालय.
झाड जपणार वाढदिवसाची आठवण
केरमधील उपक्रम; सार्वजनिक ठिकाणी झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ ः तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत, अशी ओळख असणाऱ्या केर-भेकुर्लीने मकरसंक्रातीला अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीने वाढदिवसानिमित्त किंवा अन्य कोणत्याही आनंदाच्या क्षणी कुंडीसह झाड ग्रामपंचायतीला द्यावे; ते झाड जगवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे. आनंदाचे हे क्षण निरंतर राहून गावाच्या सौंदर्यात भर पडावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. यात सहभागाचे आवाहनही ग्रामपंचायत आणि आदर्शगाव समिती यांच्याकडून करण्यात आले.
केर-भेकुर्ली ही सह्याद्रीच्या रांगांमधील दुर्गम पण देखण्या गावांची ग्रामपंचायत. गेल्या काही वर्षांत या ग्रामपंचायतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदर्श गाव म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल अनेक पातळ्यांवर घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सर्वच उपक्रमांना वेळोवेळी ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे गावची आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. मकरसंक्रातीनिमित्त एक नवा संकल्प करण्यात आला. गावातील ग्रामस्थांचा आदर्श गाव नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यावर गावातील अनेकांचे वाढदिवस किंवा अभिनंदन पोस्ट प्रसिद्ध होत असतात. ही आठवण गावासाठी स्फूर्तीदायी असते; पण या आठवणी चिरंतन रहाव्यात, असे प्रत्येकाला वाटते. गाव निसर्गसंपन्न आहेच; पण तो अधिक समृद्ध व्हावा आणि हा आनंदाचा दिवस गावाच्या सौंदर्यातही भर टाकणारा ठरावा यासाठी या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यासाठी आपला वाढदिवस असेल किंवा आनंदादाचा क्षण त्या दिवशी एक झाड कुंडीसह देण्याचे आवाहन केले आहे. ते चव्हाटा मंदिर, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा आदी ठिकाणी ठेवले जाईल. त्याला पाणी घालून वाढवण्याचे नियोजन केले जाईल. असे आगळे-वेगळे नाते जोडायचे असल्यास कुंडीसह झाड ग्रामपंचायत कार्यालयात आणुन द्यावे, असे आवाहन करीत ग्रामपंचायतीने आदर्श उपक्रमाचा प्रारंभ केला आहे.
---
ग्रामपंचायत म्हणते...
- यापुढे वाढदिवस, आनंदाचा क्षण कायम स्मरणात
- कुंडीसह रोप ग्रामपंचायतीला देणे आवश्यक
- मंदिर, शाळा परिसरात कुंडी ठेवणार
- संगोपणाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार