
चिपळूण ः जीआयटीमध्ये आयआयटी बॉम्बे पुरस्कृत ई-यंत्रा प्रयोगशाळा
जीआयटीमध्ये ई-यंत्रा प्रयोगशाळा
चिपळूण, ता. १६ ः लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध उपक्रम राबवत असते. सुविधांमध्ये आता आयआयटी बॉम्बे पुरस्कृत ई-यंत्रा प्रयोगशाळासुद्धा सामील झाली आहे. या प्रयोगशाळेच्या वापरासाठी उत्सुक अशा 30 विद्यार्थ्यांची एक चाचणी आयआयटी बॉम्बेकडून घेण्यात आली. गुणांवर आधारित सर्वोत्तम दहा विद्यार्थ्यांना व पाच शिक्षकांना आयआयटीतर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयाने या प्रयोगशाळेमध्ये लागणाऱ्या सुमारे २ लाख रुपयांच्या उपकरणांची उपलब्धता करून दिली. प्रयोगशाळेचे उद्घाटन आयआयटी बॉम्बेचे डॉ. कवी आर्या यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रोबोटिक्स आणि एम्ब्डेड सिस्टीम या क्षेत्राशी निगडित अशी ही सुसज्ज प्रयोगशाळा जीआयटीच्या विद्यार्थ्यांना वापरण्यास खुली झाली आहे. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल विभागाच्या मुलांसाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त असेल. प्रा. प्रतीक ओक यांना देऊळकर, सावंत व सहप्राध्यापकांनी उत्तम सहकार्य केले. प्रा. गद्रे, प्राचार्य सचिन पाटील व विश्वस्तांचे आभार मानले.