
वेत्येत अपघातात दोघेजण गंभीर
वेत्येत अपघातात
दोघेजण गंभीर
सावंतवाडीः मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला दुचाकीची मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात काल (ता. १६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरपंच गुणाजी गावडे व त्यांच्या सहकार्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी सहकार्य केले.
---------------
मालवण सेवांगणमध्ये
‘गांधीजागर’ कार्यक्रम
मालवणः महात्मा गांधी यांची ७५ वी पुण्यतिथी व प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे २८ व २९ ला येथील नाथ पै सेवांगण येथे ''गांधीजागर'' कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त दोन दिवस येथील महात्मा गांधींविषयी व्याख्यान शिबिर होईल. यात २८ ला १०.३० ते १२ ''गांधी का मरत नाही?'' विषयावर चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान, दुपारी १२ ते १२.३० प्रश्नोत्तरे, २ ते ५ या वेळेत परिसंवाद होणार असून यात नवनाथ तुपे, मुकुंद कुळे, संपत देसाई, सुशील धसकटे, अजय कांडर सहभाग घेणार. सायंकाळी ६ ते ८ ''गांधीजींच्या वाटेवरचा प्रवास'' यावर निरंजन टकले यांचे व्याख्यान, रात्री ८ ते ८.३० चर्चा. २९ ला सकाळी १० वाजता ''गांधीजी आणि संविधान'' यावर प्रमोद चुंचुवार यांचे व्याख्यान, दुपारी ११.३० वाजता प्रश्नोत्तर, १२ वाजता ‘गांधी गारुड’ विषयावर संजीवनी खेर यांचे व्याख्यान, २ वाजता ''दक्षिण कोकणात गांधी'' वर डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे व्याख्यान, ३ ते ४.३० यावेळेत ‘गांधी आणि समाजवाद’ या विषयावर सुभाष वारे यांचे व्याख्यान, सायंकाळी ४.३० ते ५ समारोप. नोंदणीची शेवटची तारीख २० जानेवारी असून अधिक माहितीसाठी देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
-------------------
दिव्यांग शाळेस
साहित्य प्रदान
कणकवलीः येथील प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष (कै.) सुधाकर उर्फ अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांच्यावतीने दिव्यांग शाळा करंजे येथे आवश्यक साहित्य आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी स्टील कपाट, फायर एस्टिंगग्युशर, थंडीसाठीचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी गवाणकर यांचे सुपुत्र हर्षल उर्फ राजू गवाणकर, गौरव गवाणकर, महेश कामत, रुपाली कामत, देवव्रत सामंत, शिल्पा सावंत, संतोष महाजन, सविता देसाई, सुलभा सामंत, दीपक नाईक. डॉ. सायली कामत, उर्वी गवाणकर, दानिश गवाणकर व इतर उपस्थित होते.
......................