
आजोबा,माझं नांव बदलून शिवाजी ठेवता येईल
कीर्तन महोत्सवाचा चिमुकल्यांवरही प्रभाव
श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे होणारा कीर्तन महोत्सव ही चिपळूणकराना पर्वणी असते. कीर्तनकार ह.भ.प.चारूदत्त आफळेबुवा यांचे निर्भीड वक्तृत्व, इतिहासातील किंवा पुराणातील एखाद्या गोष्टीचं वर्तमानाशी साधर्म्य सांगत केलेला उपदेश हे प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे. यावेळी छत्रपती शिवरायांची आरतीही म्हणण्यात आली. हजारांपेक्षा जास्त लोक एकाचवेळी ''जय देव जय देव जयजय शिवराया'' म्हणतांना ऐकणं हा एक आनंददायी, चित्तथरारक अनुभव होता.
-संध्या साठे जोशी, चिपळूण
---
यावर्षी पाच दिवस चाललेले कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत होते. अफझलखान वध, बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील पराक्रम, लाल महालातील महाराजांचा पराक्रम, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकलेला कोंढाणा हे पाच आख्यानाचे विषय होते. केवळ कथन आणि मोजकी वाद्यं यांच्या साथीने प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्यात बुवा यशस्वी झाले. पावनखिंडीतील प्रसंग ऐकताना ऐकणारे सर्वजण भावूक झाले. डोळ्यातून पाणी आलंच. यावेळी दोन नवीन गोष्टी अनेकांच्या संग्रही जमा झाल्या. त्या म्हणजे अफझलखान भेटीपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांकेतिक भाषेत लिहिलेले पत्र. ज्या पत्रातील प्रत्येक ओळीचं आद्याक्षर घेतलं की विजापूरचा सरदार निघाला आहे असा संदेश तयार होतो.
विवेके करावे कार्यसाधन । जाणार नरतनु हे जाणून ।
पुढील भविष्यार्थी मन । रहाटोचिं नये ॥१॥
चालो नये असन्मार्गी । सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ॥२॥
रजनीनाथ आणि दिनकर । नित्यनेमे करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदीशे ॥३॥
आदिमाया मूळ भवानी । हेचि जगाची स्वामिनी ।
येकांती विवंचना करोनी ।इष्ट योजना करावी ॥४॥
आणखी एक वेगळा पाळणाही ऐकायला मिळाला. पाळणा म्हणताना आई बाळाला झोपी जा असं विनवते. या पाळण्यात राजमाता जिजाऊ शिवरायांना ‘आता नीज पुरे, जागे व्हा’ असे सांगत आहेत. थोड्या दृश्यमाध्यमांचा वापर करून शिवराज्याभिषेक साकारला गेला. पाचही दिवस अनेक शाळकरी मुलं या कीर्तनासाठी उपस्थित होती, कान देऊन आणि मन लावून ऐकत होती हा मोठाच आशेचा किरण आहे. एक पाच सहा वर्षाचा चिमुकला रोज आजोबांसमवेत येत होता. शिवचरित्र ऐकल्यामुळे एकदम भारावून गेलेला पहायला मिळाला. "