
वीस वर्षानंतरही पर्यायी शेतजमीन नाही
वीस वर्षानंतरही पर्यायी शेतजमीन नाही
तिलारीग्रस्तांची व्यथा; जमीन खुली करण्यासाठी उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः तिलारी प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने दिलेली शेतजमीन अद्यापही ताब्यात आलेली नाही. मूळ मालक जमिनीचा ताबा सोडत नसल्याने माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे. ही शेतजमीन शासनानेच खुली करून द्यावी, अन्यथा २६ ला उपोषण करू, असा इशारा प्रकल्पग्रस्त सदाशिव सावंत यांनी दिला. येथील तहसीलदारांना तसे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्त असल्याने आपणास आवाडे येथे शासनाने पर्यायी शेतजमीन दिली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन वीस वर्षे लोटली तरी ती जमीन अद्यापही ताब्यात मिळालेली नाही. याबाबत अनेकवेळा शासकीय अधिकाऱ्यांशी कागदोपत्री व्यवहार, उपोषणेही केली आहेत; मात्र, गेली वीस वर्षांपासून या जमिनीवर मूळ मालकाने खटला दाखल केला आहे. शासनाने दिलेल्या जागेत जाण्यास मूळ मालक अडवणूक करीत आहे. मी प्रकल्पग्रस्त असूनही या बाबीकडे शासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहे. ही जमीन पडीक राहिल्याने माझे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे माझ्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या जमिनीवर माझा ताबा मिळून द्यावा तसेच वीस वर्षांची भरपाई मिळवून द्यावी. तसा निर्णय शासनाने न घेतल्यास प्रजासत्ताक दिनी तहसिल कार्यलायसमोर उपोषण छेडू, असा इशाराही शेतकरी सावंत यांनी दिला.