
अंगणवाडी सेविकांची भरती सुरू होणार
rat१८१७.txt
बातमी क्र..१७ ( पान २ )
अंगणवाडी सेविकांची भरती २६ जानेवारीनंतर
२० हजार पदे भरणार ; शैक्षणिक पात्रता निकषात बदल
सकाळ वृत्तसेवा ः
गुहागर, ता. १८ ः राज्य शासनाने २६ जानेवारीनंतर २० हजार अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे जाहीर केले आहे. या वेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य हे तीन महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात कोरोना महामारीनंतर आजतागायत अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया झालेली नाही. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अंगणवाड्यांमधील पदे रिक्त आहे. त्यामुळे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या तीन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात अडचणी येत आहेत. ही त्रुटी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात २० हजार अंगणवाडी सेविकांची पदभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मिशन पोषण २.० या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे. या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
विश्वसनीय माहितीनुसार २६ जानेवारीनंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती मागवणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल
--