
वाहतूक नियमांचे पालन आवश्यक
76517
वैभववाडी ः येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली.
वाहतूक नियमांचे पालन आवश्यक
अमित यादव ः वैभववाडीत रस्ता सुरक्षा रॅली
वैभववाडी, ता. १८ ः अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. स्वतःसह इतरांच्याही जीवाचे रक्षण करण्यासाठी वेगावर नियत्रंण ठेवा, असे आवाहन येथील पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी येथे केले.
राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत येथील पोलिस ठाण्याच्या माध्यमातून पोलिस ठाणे ते दत्तमंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलिस निरीक्षक यादव यांच्यासह उपनिरीक्षक प्रवीण देसाई, उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलिस कर्मचारी, रिक्षाचालक आदींसह अर्जुन रावराणे विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी यादव यांनी वाहन चालविताना प्रत्येक वाहनचालकाने स्वतःसह दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. वाहन चालविताना कधीही स्टंटबाजीसारखे प्रकार करू नयेत. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले तर अपघात टाळता येतील. दुचाकी चालविताना हेल्मेट, चारचाकी चालविताना सीटबेल्टचा वापर वाहनचालकांसह प्रवाशांनीही करावा. आपला जीव खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रवास करताना थोडे लवकर निघून वेळेत आणि सुरक्षितरित्या आपल्या ठिकाणी पोहोचा, असे आवाहन केले. अपघातग्रस्तांना मनात कोणतीही भीती न बाळगता मदत करा, असे देखील सांगितले. पोलिस ठाणे ते दत्तमंदिर आणि पुन्हा पोलिस ठाणे अशी जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत जोरदार घोषणाबाजी केली.