चिपळूण ःचिपळुण शहरावर आता सीसीटीव्हीचा वॉच
ratchl१८५.jpg
७६५६५
चिपळूणः शहरात पालिकेच्यावतीने बसवण्यात येणारी सीसीटीव्हीची यंत्रणा.
चिपळुणवर आता सीसीटीव्हीची नजर
गुन्हेगारी कारवायांना चाप; २५ कॅमेरे बसवणार
चिपळूण, ता. १८ः शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम चिपळूण नगर पालिकेकडून सुरू केले आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी २५ कॅमेरे बसवले जात असून सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष चिपळूण पोलिस तसेच नगरपालिका कार्यालयात राहणार आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना चाप बसण्याची शक्यता असून पोलिसांचे कामदेखील सोपे होणार आहे.
मध्यंतरी चिपळूण शहरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. एका रात्रीत ८ ते १० घरफोड्या करून चोरटे लाखोंचा ऐवज लंपास करत होते. चोरट्यांचा हा हैदोस पोलिसांची झोप उडवणारा ठरला होता. त्याचवेळी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी सुरू झाली होती. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे तसेच त्यांच्यानंतर येथे आलेले सूरज गुरव, नवनाथ ढवळे आणि विद्यमान सचिन बारी यांनीदेखील चिपळूण नगरपालिकेकडे सतत पत्रव्यवहार करून शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी पाठपुरावा केला होता.
नगरपालिका सभागृहातदेखील शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र निधी खर्च करण्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता. आता मात्र नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश शिंगटे यांनी कॅमेऱ्याचा विषय गांभीर्याने घेऊन कामालादेखील सुरवात केली आहे. त्यामुळे सुमारे ९ वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण होताना दिसत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शहरातील महत्वाची अशी ६ ठिकाणे निवडण्यात आली असून एकूण २५ कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहराचे प्रवेशद्वार पाग पावरहाऊस, बहादूरशेख नाका तसेच शहरातील महत्वाचे ठिकाण असलेले चिंचनाका, भेंडीनाका, बाजारपूल आणि नगर पालिका अशा ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. पोलिसांच्यावतीने देखील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अनेक गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल, दुकाने या ठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे बहुतांश चिपळूण शहरावर आता सीसीटीव्हीचा वॉच कायम राहणार आहे.
चौकट
कारवायांना चाप
सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारी कारवायांना चाप बसण्याची शक्यता असून गुन्ह्याची उकल करण्याकामी पोलिसांना या सीसीटीव्हीचा मोठा फायदा होऊन पोलिसांचे काम अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी देखील अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना सीसीटीव्हीची मोठी मदत मिळाली होती. निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाची उकल करताना देखील सीसीटीव्हीची भूमिका महत्वाची ठरली होती. चोरट्यांचा छडा लावतानादेखील सीसीटीव्ही पोलिसांच्या उपयोगी पडले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.