
बॅंक फसवणूक प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी
बॅंक फसवणूक प्रकरणी
तिघांना न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी, ता. १८ ः सोन्याचे बनावट दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिघाही संशयितांची रवानगी आज न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या गुन्ह्यात अन्य साथीदार असल्याच्या संशयावरून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत.
शहरातील खासगी बँकेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून पावणे दोन लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोल्हापूर-राजारामपुरी येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ऋतेश माजिक याला तातडीने बँकेतून ताब्यात घेण्यात आले होते. तर कोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार व सागर ऊर्फ नरेंद्र नलवडे या दोघांना कोल्हापूर येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील तिन्ही संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. यातील सोनार पोतदार यानेच हे दागिने बनवून अन्य दोघांना दिल्याचे समोर आले असून त्यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी मिळविले आहे. तर माजिक व नलवडे यांनी संगनमताने अशाच प्रकारे तीन बँकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोल्ट्री व्यवसायात नुकसान झाल्याने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली संशयित माजिक याने दिली आहे.