
विविध कलागुण प्रसन्नतेचे साधन
76703
कसाल : विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सुहास वरुणकर व मान्यवर.
विविध कलागुण प्रसन्नतेचे साधन
सुहास वरुणकर ः कसाल हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण
ओरोस, ता. १९ ः विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध कलागुण आत्मसात केले पहिजेत. त्यामुळे मन आनंदी राहतेच, शिवाय कलेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नही मिळू शकते. यासाठी प्रशालेने कलादालन सुरू केल्यास नाट्य दिग्दर्शनासाठी निश्चितच साहाय्य करू, अशी ग्वाही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास वरुणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसालच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिली.
यावेळी मालवणी रिल्स कलाकार अर्चना परब यांनी कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. भाषा विचार व्यक्त करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे मालवणी भाषेतून केलेल्या रिल्सनी आपल्याला युट्यूब वरून रातोरात कशी प्रसिद्धी मिळाली, हा प्रवास विद्यार्थ्यांसमोर ठेवला. तसेच बोलीभाषेचा आदर करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी व सरंबळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांना राज्यस्तरावर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेकडून सत्कार करण्यात आला. कसाल गावचे सरपंच राजन परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शैक्षणिक वर्षातील यशस्वी विद्यार्थ्यांसह कला, क्रीडा, निबंध, वक्तृत्वामध्ये यश संपादन केलेल्यांचे प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रभाकर सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे वर्षभरात भव्य कलादालन उभारण्याचा मानस व्यक्त केला. जेणेकरून परिसरातील इतर विद्यार्थी या कलादालन लाभ घेऊ शकतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत परब यांनी विद्यार्थी शिस्तप्रिय असावा. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होत असून यामुळे भविष्यात तरुणपिढी भरकटायला वेळ लागणार नाही. याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे, असे विचार व्यक्त केले. दुपारी प्रशालेचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये नृत्य, नाटिका, तबला व हार्मोनिअम वादन, कला, नृत्यप्रकार सादर केले. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी व पोट्रेट प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर यांनी आभार मानले.