सावंतवाडीत बीपीओ सेंटरचा प्रारंभ

सावंतवाडीत बीपीओ सेंटरचा प्रारंभ

Published on

76770
सावंतवाडी ः बीपीओ सेंटरचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

सावंतवाडीत बीपीओ सेंटरचा प्रारंभ

स्थानिकांना रोजगाराची संधी; व्हॅरेनियम, सेक्युर क्रेडेन्शियल्सचा उपक्रम


सावंतवाडी, ता. १९ ः व्हॅरेनियम क्लाउड आणि सेक्युर क्रेडेन्शियल यांच्या माध्यमातून कोकणात पहिल्यांदाच ''बीपीओ सेंटर'' सावंतवाडीत आजपासून सुरू झाले आहे. यासाठी लागलीच २५ उमेदवारांना संधी देखील देण्यात आलेली आहे. सोमवारपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत. या बीपीओ सेंटरमुळे स्थानिक मुलांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचा माहिती सेक्युर क्रेडेन्शियल्सचे राहुल बेलवलकर यांनी दिली.
बीपीओ किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) ही एक प्रकारची आउटसोर्सिंग प्रकिया आहे. ज्यामध्ये व्यवसायातील एका विशिष्ट प्रक्रियेचे संचालन व व्यवस्थापन तिसऱ्या कंपनीला सोपविले जाते व त्या संदर्भात एक करार केला जातो. भारतात बीपीओ हा एक मोठा उद्योग असून त्यापासून दरवर्षी सुमारे ११ अब्ज डॉलर रेव्हेन्यू मिळतो व लाखो लोकांना रोजगारही मिळतो. सिंधुदुर्गातील मुलांना येथेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी व्हॅरेनियम क्लाउड्सच्या सहकार्याने सेक्युर क्रेडेन्शियल्सने असेच एक बीपीओ सेंटर सावंतवाडीमध्ये सुरू केले आहे. त्यामुळे येथील मुलांना जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, असे बेलवलकर यांनी सांगितले.
बेलवलकर पुढे म्हणाले, "मोठ्या कंपन्यांना जे उमेदवार लागतात, त्यांची वैयक्तिक माहिती या बीपीओच्या माध्यमातून पूर्णपणे तपासली जाणार आहे. त्यात त्यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, फिझिकल व्हेरीफिकेशन, त्यांना जॉबसाठी कॉल करणे या सर्व गोष्टी बीपीओच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. भविष्यात या गोष्टी एकेक करून सुरू होतील; पण या ठिकाणी डेटा एंट्रीपासून सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांत क्यूसी प्रोसेस सुद्धा सुरु करण्यात येणार आहे.
मुलांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळाला तर तो हवा असतो. हा दृष्टिकोन ठेवून सेक्युर क्रेडेन्शियल्सने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी व्हॅरेनियमशी ''टाय अप'' केले आहे. सेक्युर क्रेडेन्शियल्स यांनी जेव्हा याची सुरुवात केली होती, तेव्हा मोजक्याच उमेदवारांची निवड केली होती; पण तो अनुभव खूप हुरूप वाढवणारा होता. त्यामुळे सावंतवाडीमध्ये अलीकडेच जो रोजगार मेळावा झाला, त्यात १५ उमेदवारांची निवड करण्यात आली. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये किमान शंभर उमेदवार या बीपीओमध्ये असावीत, असे उद्दिष्ट सेक्युर क्रेडेन्शियल्सने ठेवले आहे. त्याचा फायदा येथील मुलांनाच होणार आहे."
बेलवलकर म्हणाले, "विशेषतः सेवा क्षेत्रात येथील स्थानिक मुलांना खूप कमी संधी उपलब्ध असतात; पण आम्ही आज जे बीपीओ सेंटर सुरू केले आहे, त्यातून मुलांना मोठा फायदा तर होईलच; पण ते एक आदर्श बीपीओ सेंटर ठरेल. या बीपीओ सेंटरचा आदर्श घेऊन भविष्यात अनेक बीपीओ सेंटर येथे सुरू होतील. मुलांना रोजगाराच्या स्थानिक संधी मिळतील. हा याचा मोठा फायदा असेल. सावंतवाडीमध्ये अलीकडेच जो रोजगार मेळावा झाला, त्यातून अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. ज्या कंपन्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या, त्यांनी येथील उमेदवारांच्या पात्रतेविषयी समाधान व्यक्त केले. त्यामुळे भविष्यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. त्यातून स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबईच्या तुलनेत येथील स्थानिक मुलांचा विचार केला तर येथील मुले खूप सिन्सियर आहेत. हुशार आहेत. मुंबईमध्ये रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध असल्याने नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण जास्त आहे; पण सिंधुदुर्गात तसे नाही. त्यामुळे सेक्युर क्रेडेन्शियल्सने कोकणात बीपीओ सेंटर उभारायचे निश्चित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com