माध्यमांकडून लोकशाही गिळंकृतीचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माध्यमांकडून लोकशाही गिळंकृतीचे काम
माध्यमांकडून लोकशाही गिळंकृतीचे काम

माध्यमांकडून लोकशाही गिळंकृतीचे काम

sakal_logo
By

76807
सावंतवाडी ः येथे व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर. व्यासपीठावर विजय शेट्टी, अॅड. संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर आदी.

माध्यमांकडून लोकशाही गिळंकृत

अमेय तिरोडकर ः सावंतवाडीत कोरगावकर व्याख्यानमाला

सावंतवाडी, ता. १९ ः लोकशाहीमुळे माध्यमे आहेत, त्यांचे अस्तित्व आहे. लोकशाहीमुळे माध्यमांना सन्मान आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीत लोकशाही गिळंकृत करण्याचे काम बहुतांशी माध्यमांकडून होत आहे, असे मत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी येथे व्यक्त केले.
राजकारणी, उद्योजक आणि माध्यमांच्या तिहेरी युतीत आताची लोकशाही फसली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत ठेवून नको त्या गोष्टी माध्यमांवर दाखवल्या जात आहेत.‌ राजकारण्यांचे भांडण, नेत्यांच्या बायकांनी म्हटलेली गाणी, अभिनेत्यांची खासगी लाईफस्टाईल अशा गोष्टी दाखवून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित केले जात आहेत. हा थिल्लरपणा म्हणजे लोकशाहीला माध्यमांनी दिलेले मोठे आव्हान आहे, अशी खंतही तिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केली. येथील श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यातर्फे आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत ''माध्यमांचे लोकशाहीसमोर आव्हान'' या विषयावर ते बोलत होते. माध्यमांचा उपयोग पूर्वी संवाद घडविण्यासाठी केला जात होता; मात्र आता स्टुडिओमधील डिबेटींगच्या नादात केवळ वाद निर्माण केले जात आहेत. त्यामुळे आता ‘स्पॉट’ पत्रकारिताही संपुष्टात आली आहे, अशी नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, अॅड. संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर, सुमेधा नाईक, पावसकर आदी उपस्थित होते.
तिरोडकर पुढे म्हणाले, ‘‘आता माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणे ही मोठी घोडचूक आहे. माध्यमांनी लोकशाही खऱ्या अर्थाने गिळंकृत केली आहे. माध्यमांचे काम संवाद घडवून देण्यासाठी होते; मात्र आज स्टुडिओमधील डिबेटच्या नादात केवळ वाद घडून आणले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे कधीच एकत्र येऊ नयेत, हाच यामागचा उद्देश असून याचा सर्वस्वी फटका लोकशाहीला बसला आहे. पूर्वी घटनास्थळावर जाऊन पत्रकारिता केली जात होती. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखती व्हायच्या, सर्वांच्या बाजू समजून घेतल्या जात होत्या. परिणामी सर्वसामान्यांच्या भावना सुद्धा माध्यमांवर यायच्या; मात्र आज स्टुडिओत बसून नेत्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या डिबेटिंगमुळे सर्वसामान्यांचा आवाज पूर्णतः दबला गेला आहे आणि याचाच फायदा राजकारण्यांना झाला आहे.’’
तिरोडकर पुढे म्हणाले, "आज माध्यमातून नको त्या विषयावर प्रकाशझोत टाकून सर्वसामान्यांचे लक्ष त्याकडे वेधून घेतले जात आहे. यात टीव्ही चॅनेलचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. कारण लोक प्रत्यक्ष दिसण्याकडे जास्त आकर्षित होतात आणि याचाच फायदा राजकारणी घेत आहेत. कारण हीच चॅनेल राजकारणी आणि उद्योजकांनी विकत घेतलेली असतात. ज्यावेळी बेरोजगारी, महागाईवर सर्वसामान्यांकडून आवाज उठविला जातो, त्याचवेळी जातीय आणि धर्मवादाची ''पिल्ले'' अशा चॅनेलवर सोडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधून घेतले जाते. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहून नको त्या मुद्यावर प्रक्षेपण होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे आता लोकशाही विरोधातील गेलेली माध्यमे चौथा स्तंभ कशी बनू शकत नाहीत.’’
-----------
चौकट
बॅलेट पेपरवरच मतदान गरजेचे
ईव्हीएम हॅक केली जात असल्याचे सांगण्यात येते; परंतु हे तितकेसे खरे नाही. ईव्हीएमपेक्षा माणसाची मनेच हॅक केली गेली आहेत. त्यामुळे निवडणुका ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरवर झाल्या तरी निकाल तोच लागणार आहे. त्यात बदल होणार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. ईव्हीएमवर मतदानाला जर्मनीत बंदी घालण्यात आली आहे. कारण आपले मत कुणाला गेले, हे जाणण्याचा अधिकार मतदाराला आहे; मात्र तंत्रज्ञानामुळे त्यात बाधा येते. कारण सर्वसामान्य व्यक्ती तंत्रज्ञानाबद्दल अनभिज्ञ असते. त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान होणे आवश्यक असल्याचे तिरोडकर यांनी सांगितले.