गुहागर ः चारचाकीचा भीषण अपघात; 10 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर  ः चारचाकीचा भीषण अपघात; 10 ठार
गुहागर ः चारचाकीचा भीषण अपघात; 10 ठार

गुहागर ः चारचाकीचा भीषण अपघात; 10 ठार

sakal_logo
By

पान १

७६८०९
गुहागर ः अपघातात मोटारीचा झालेला चक्काचूर.

मोटार-ट्रकच्या धडकेत १० ठार
रायगडजवळ घटना; मृतांत चार महिलांसह बालकाचा समावेश; मुंबईतून हेदवीकडे येताना घाला
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील (जि. रायगड) रेपोली येथे गुरुवारी (ता. १९) पहाटे ५ च्या सुमारास मोटार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. अपघातात ९ प्रवासी जागीच ठार, तर जखमी चार वर्षीय बालकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. अपघातातील सर्व हेदवी जुवेवाडी (गुहागर) येथे कार्याला येत होते.
अमोल रामचंद्र जाधव (वय ४०), नीलेश चंद्रकांत पंडित (४५), दिनेश रघुनाथ जाधव (३० सर्व रा. हेदवी, ता. गुहागर), निशांत शशिकांत जाधव (२३, विरार पूर्व, कोकण निवास नारंगी रोड), स्नेहा संतोष सावंत (४५, कळंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. जोगेश्वरी मुंबई), कांचन काशिनाथ शिर्के (५८, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. नवी मुंबई), दीपक यशवंत लाड (६०, रा. कॉटन ग्रीन मुंबई), मुद्रा नीलेश पंडित (१२, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, सध्या रा. मुंबई), नंदिनी नीलेश पंडित (४०, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, सध्या रा. मुंबई) या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर भव्य नीलेश पंडित (वय ४, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, सध्या रा. मुंबई) या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर अधिक उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच पालीजवळ त्याचा मृत्यू झाला.
अपघात नेमका कसा झाला हे कळू शकलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे. लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच ४३ यू ७११९) व मुंबईकडून गुहागरकडे जाणारी मोटार (एमएच ४८ बीटी ८६७३) यांची रेपोली येथे समोरासमोर धडक झाली. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणले. रायगड पोलिस अधिक तपास करत आहेत. सर्व प्रवासी गुहागर तालुक्यातील हेदवी येथे मनोहर जाधव यांच्या आईच्या वर्षश्राद्धासाठी येत होते.
अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा चक्काचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती; मात्र काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूककोंडी सुरळीत केली. अपघाताची माहिती समजताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे भेट दिली.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, गोरेगाव पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काकतकर सहकाऱ्यांसमवेत, तसेच साळुंके रेस्क्यू टीम व माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी मृत्युमुखी पडलेल्यांना तसेच गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय बालकाला रुग्णवाहिकेने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात मदत केली. चार वर्षीय बालकाला अधिक उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

हेदवी गावावर शोककळा
जाधव कुटुंबामधील १० जणांच्या मृत्यूमुळे हेदवी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजताच हेदवीतील काही मंडळी घटनास्थळी पोचली. अपघातग्रस्तांमध्ये हेदवीतील तिघे आहेत. जाधव कुटुंबामधील एक विवाहित महिलेचाही समावेश आहे. तिचा पती आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. जाधव कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे.

जनआक्रोश समितीचे सदस्य धावले
मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघाताची माहिती मिळताच जनआक्रोश समितीचे क्रियाशील सदस्य नरेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माणगाव, महाड येथील सदस्यही रवाना झाले. अपघात जेथे झाला तिथे शासन, प्रशासनाकडून मार्ग बदलाचे फलक न लावणे, एकाच रस्त्यावरून दोन दिशा मार्ग सुरू होता का, त्याची कल्पना देणारे रेडियमचे फलक लावले होते का, याची चौकशी करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनआक्रोश समिती करणार आहे.


महामार्गाचे काम करण्याची मागणी
माणगावपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या लोणेरे गावावरून माणगावच्या दिशेने येण्यासाठी पुढे दुहेरी मार्ग सुरू होतो तो गारळच्या फाट्यापर्यंत सुरू आहे; मात्र लेन बदलण्यासाठी जे डायव्हर्शन आहे ते अतिशय खराब असल्यामुळे चालक डाव्या लेनला न जाता सरळ उजव्या लेनकडून गाडी पळवतात. त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.


हेदवीत सात जणांवर अंत्यसंस्कार
मुंबई-गोवा महामार्गावर रेपोली तालुका माणगाव येथे झालेल्या भीषण अपघातामुळे हेदवीतील जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री हेदवीत ७ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन मृतांवर मुंबईत व एक मृत महिलेवर कळंबस्ती (ता. सावंतवाडी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघातामुळे हेदवी गावावर शोककळा पसरली आहे. आज हेदवी उमराठ गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.