
कृषी, फलोत्पादनात व्यवसाय संधी
76843
मालवण ः उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रदीप हळदवणेकर यांचा सत्कार करताना सुधीर हेरेकर, वामन खोत, प्रा. गणेश सावंत, प्रा. जितेंद्र गावडे, प्रा. वैभवी वाक्कर आदी.
कृषी, फलोत्पादनात व्यवसाय संधी
प्रदीप हळदवणेकर ः मालवणमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मालवण, ता. १९ : पूर्वी शेती ही कनिष्ठ समजली जायची; मात्र आता वरिष्ठ शेती संकल्पना रुजत आहेत. शेतीशिवाय पर्याय नाही. कृषी विषयाच्या पदवी मिळवून शेतीसह पूरक व्य़वसायांच्या संधी शोधल्या पाहिजेत. कृषी, फलोत्पादन या क्षेत्रात करियर व उद्योगाच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रांत करियर घडवावे, असे प्रतिपादन कुडाळ-मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रदीप हळदवणेकर यांनी येथे केले.
येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात कृषी व फलोत्पादन क्षेत्रातील करियर संधी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संचलित मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता हळदवणेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हळदवणेकर यांचा महाविद्यालयातर्फे संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक वामन खोत, प्रा. गणेश सावंत, प्रा. जितेंद्र गावडे, प्रा. वैभवी वाक्कर उपस्थित होते.
यावेळी हळदवणेकर म्हणाले, ‘‘आज कृषीचाच एक भाग असणाऱ्या फलोत्पादन म्हणजेच ‘हॉर्टीकल्चर’मध्ये करियरच्या अनेक संधी आहेत. भारत देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असून १४० कोटी जनतेला अन्नधान्य, फळ फळावळ पुरविण्याचे काम शेती व फलोत्पादना व्यवसायांतून होत आहे. आज कोकणात आंबा, काजू या व्यतिरिक्त देखील अनेक फळांची झाडे उपलब्ध आहेत; मात्र शेती विषयक अभ्यास नसल्याने आपण मागे पडत आहोत. आज जिल्ह्यात परप्रांतीय येऊन शेती करत असून त्यातून स्वतःचा विकास साधला आहे. त्यामुळे येथील मुलांनी शेती व फलोत्पादन अभ्यासक्रमाकडे वळावे. यासाठी पालक, शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. फलोत्पादनामध्ये सिव्हिल सर्व्हिस, अॅग्रीकल्चर सर्व्हिस, बियाणे निर्मिती, खत निर्मिती, कीटकनाशके निर्मिती, गार्डनिंग, बँकिंग आदी करिअर व उद्योजकीय संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात कौशल्याला मोठे महत्त्व आहे.’’