
299 प्राथमिक शिक्षक दुर्गममधून सुगममध्ये
दुर्गममधून २९९ शिक्षक सुगममध्ये
जिल्हा परिषद बदली प्रक्रिया; सेवाज्येष्ठतेमुळे १०० जणांची हुकली संधी
रत्नागिरी, ता. २० ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेची यादी जाहीर झाली आहे. बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या ३९९ शिक्षकांपैकी २९९ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. या प्रक्रियेमुळे बहुसंख्य शिक्षक दुर्गममधून सुगम क्षेत्रातील शाळांमध्ये आले आहेत.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात बदली अधिकार पात्र ठरलेल्या १ हजार ४७३ शिक्षकांना बदलीसाठी शाळा विकल्प ऑनलाइन भरण्यासाठी मुदत दिली गेली होती. त्यापैकी ३९९ शिक्षकांनी बदलीसाठी विकल्प भरले. अपेक्षित शाळा नसल्यामुळे बहुसंख्य शिक्षकांनी बदली प्रक्रियेतून माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. अवघड क्षेत्रातील अनेक शिक्षक सुगम शाळांमध्ये येण्यास उत्सुक असतानाही प्रत्यक्ष बदली प्रक्रियेत आलेल्या शिक्षकांचा टक्का कमी आहे. विकल्प भरलेल्यांपैकी २९९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शंभर शिक्षकांनी शाळा विकल्पच समान भरल्यामुळे त्यांना संधी मिळालेली नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. बदली करताना सेवाज्येष्ठता पाहिली जाते आणि बदलीसाठी प्राधान्य दिले जाते. शंभर शिक्षक बदली प्रक्रियेतून बाहेर गेले असून पुढील टप्प्यात त्यांना संधी मिळणार नाही.
चौकट
पुढील टप्प्यासाठी ८७१ शिक्षक
बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांचा पुढील टप्पा सुरू झाला असून, शाळा विकल्प भरण्यासाठी २१ ते २४ जानेवारी मुदत दिली आहे. यामध्ये ८७१ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या लॉगिनला रिक्त पदांची यादी टाकण्यात आली आहे. त्या शाळा बदलीसाठी निवडणे बंधनकारक करण्यात आली आहे.