
बंदूक बाळगल्याप्रकरणी कुडाळातील दोघे ताब्यात
बंदूक बाळगल्याप्रकरणी
कुडाळातील दोघे ताब्यात
आंबोलीत कारवाई; जामिनावर मुक्तता
सावंतवाडी, ता. २० ः शिकारीच्या उद्देशाने बेकायदा सिंगल बॅरल बंदूक घेऊन जाताना आढळल्याप्रकरणी कुडाळ येथील दोघांना आज आंबोली येथे ताब्यात घेतले. येथील तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. त्यांच्याकडून बंदुकीसह दुचाकी असा ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भानुदास अर्जुन वालावलकर (वय ३२, रा. तेंडोली गवळीवाडी) व ऋत्विक यशवंत परब (वय २२, रा. गोवेरी-परबवाडी), अशी संशयिताचे नावे आहेत. सावंतवाडी पोलिसांनी ही माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भानुदास वालावलकर व ऋत्विक परब हे दोघेही सावंतवाडीहून दुचाकीने आंबोलीच्या दिशेने जात होते. ते आंबोली दुरुक्षेत्रावर पोहचले असता पोलिसांनी त्यांची दुचाकी थांबवून चौकशी केली व त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली. यावेळी बॅगेत बंदूक आणि जिवंत काडतुसे आढळली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करत बंदूक, काडतुसे व दुचाकी असा मिळून ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघाही संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून जामीनावर मुक्तता केली.