‘इंजिनियरींग’ही आता मराठीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंजिनियरींग’ही आता मराठीत
‘इंजिनियरींग’ही आता मराठीत

‘इंजिनियरींग’ही आता मराठीत

sakal_logo
By

77169
सावंतवाडी : ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना मंत्री दीपक केसरकर. व्यासपीठावर राजन तेली, मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी (छायाचित्र ः रुपेश हिराप)

‘इंजिनिअरिंग’ही आता मराठीत

मंत्री दीपक केसरकर : शिक्षकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती नाही

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः मराठी शाळा वाचविण्यासाठी आता डिप्लोमा-इंजिनिअरिंगसारखे अभ्यासक्रमही मराठीत शिकविले जातील. तसा निर्णय केंद्रस्तरावर घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून शिक्षकांच्या नोकऱ्या जाण्याच्या अफवा कोण पसरवित असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
विनाअनुदानित शाळा आणि शिक्षक सेवकांसाठी साडेअकराशे कोटींचे पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले आहे. त्यात शिक्षक सेवकांचे वेतनसुद्धा दुप्पट करण्यात आले आहे. येत्या काळात शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी या वेळी दिला.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित शैक्षणिक संघटनांचा स्नेहमेळावा माजगाव येथे पार पडला. या वेळी मंत्री केसरकर बोलत होते.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रीय मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, राजेंद्र माणगावकर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, बबन ऊर्फ नारायण राणे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना देसाई, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे प्रगती करता येते, अशी येथील पालकांची आणि विद्यार्थ्यांची धारणा झाली आहे. सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगसारखे इंग्रजीत शिकवले जाणारे अभ्यासक्रम सोपे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पाठविले जाते; मात्र आता हे अभ्यासक्रमसुद्धा मराठीत करण्याचा निर्णय झाला आहे. मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. येत्या काळात या निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून शिक्षकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती कोणी पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. कोणाही शिक्षकाच्या नोकरीवर गदा येणार नसून यासाठी आमचे सरकार शिक्षकांच्या पाठीशी आहे.’’
भाजपचे जिल्हाध्यक्ष तेली यांनी पटसंख्येअभावी शिक्षक मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याला शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांची मुजोरी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांचा आता आपल्यालाच बंदोबस्त करावा लागेल, असे सांगून काहींवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा या वेळी दिला. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून आल्यानंतर संस्था आणि शिक्षक या दोनच विषयांकडे लक्ष द्यावे. त्यांना मिळणारे ५ कोटींचे अनुदान त्यांनी केवळ शिक्षण विभागावरच खर्च करण्याबाबत व्यवस्था करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
---
मातृभाषेतून उत्तम ज्ञान
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, ‘‘ज्ञान सगळ्यात चांगले मातृभाषेतून मिळते. त्यामुळे या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. इंग्रजी अभ्यासक्रमाची जबरदस्ती इंग्रजांच्या काळापासून झाली; मात्र त्यात बदल करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. तसे झाल्यास मातृभाषेतून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना सोपे होऊन त्यांची आकलन शक्तीही वाढेल. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी तुमच्यातीलच एक तडफदार आणि तरुण उमेदवार रिंगणात आहे. त्यांना विजयी करण्यासाठी प्रचारात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे तुम्हीही मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या.’’