
चिमुकले रंगले चित्रांच्या दुनियेत
77469
कोकिसरे ः माधवराव पवार विद्यालयात चित्रकलेत मग्न झालेली मुले.
चिमुकले रंगले चित्रांच्या दुनियेत
चित्रकला स्पर्धा ः वैभववाडीत २७५ जण सहभागी
वैभववाडी, ता. २२ ः नेहमी मोबाईल आणि टीव्हीवरील कार्टूनच्या दुनियेत हरवून जाणारी चिमुकली आज पेन्सिल, खोडरबर आणि रंगात रंगून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथील माधवराव पवार कोकिसरे विद्यालयातील केंद्रावर या स्पर्धेला उर्त्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २७५ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
सकाळ माध्यम समुहाच्या माध्यमातुन आज राज्यभरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी येथील कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात केंद्र होते. या केंद्रावर सकाळपासून विद्यार्थ्यांची लगबग दिसून येत होती. इतर रविवारी टीव्ही आणि मोबाईलवरील कार्टूनच्या दुनियेत हरवून जाणारी चिमकुली आज सकाळपासून पेन्सिल, खोडरबर, पट्टी, रंग, ब्रश आदी साहित्य घेऊन केंद्रावर हजर राहिली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी मनापासून चित्र काढण्यात दंग झाला. सुंदर चित्र काढण्याची प्रत्येकाची धडपड दिसत होती. या केंद्रावर एकूण २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये अ गटातून ८१, ब गटातून ८५, क गटातून ७२ आणि ड गटातील ३४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोकिसरे विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद गोखले, विलास कदम, रामचंद्र धावडे, दीपा हिरुगडे, स्वप्निल पाटील, पल्लवी काळे, उज्ज्वला सावंत, चंदा तांबे आदींनी परिश्रम घेतले.