
पंधराव्या वित्ततील कामे वगळून विकास आराखडे
rat२२३६.TXT
( पान ३ साठी)
विकास आराखडे तयार करा...
ग्रामपंचायतीना सूचना ; ग्रामसभेचा ठराव आवश्यक
रत्नागिरी, ता. २३ ः २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. विकास आराखडे तयार करताना पंधराव्या वित्त आयोगासह अन्य योजनांतून मिळणाऱ्या निधीची तजवीज करून विकासकामांचा ग्रामसभेमार्फत आराखड्यात समावेश करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने पंचायतराज मंत्रालयामार्फत गावांच्या शाश्वत विकासाकरिता १७ ध्येयांचा समावेश असलेल्या ९ संकल्पना जाहीर केल्या आहेत. याआधारेच गावांचा समृद्ध विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास आराखडा तयार करताना ९ संकल्पांपैकी एक किंवा दोन संकल्पनांची निवड ग्रामसभेत करावी. यासाठी वित्त आयोगाचा ६० टक्के बंधित निधी खर्च करण्यात यावा. यात ’जलसमृद्ध गाव’ व ’स्वच्छ व हरित गावां’ची संकल्पना यांचा समावेश करता येणार आहे. ग्रामसभेत निवडण्यात आलेल्या दोन संकल्पनेचा ग्रामसभेचा ठराव केंद्र शासनाच्या पोर्टलमध्ये अपलोड करण्यात यावा. ई-ग्रामस्वराज्य पोर्टलमध्येही त्याचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या ४० टक्के अधित निधीतून कमीत कमी ५० टक्के उपक्रमावर ग्रामपंचायतींनी आराखड्यात तरतूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमधील ७ ते १० प्रतिनिधींना यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.