बोचऱ्या थंडीतही सप्तरंगात रमली मुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोचऱ्या थंडीतही सप्तरंगात रमली मुले
बोचऱ्या थंडीतही सप्तरंगात रमली मुले

बोचऱ्या थंडीतही सप्तरंगात रमली मुले

sakal_logo
By

77561
सावंतवाडी ः येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात चित्रे रेखाटण्यात मग्न मुले. (छायाचित्र ः निखिल माळकर)


बोचऱ्या थंडीतही सप्तरंगात रमली मुले

‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली, ता. २२ ः ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या चित्रकला स्पर्धेला आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १६ केंद्रामधून शेकडो चिमुकल्‍यांसह, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी रंगरेषांच्या भावविश्‍वात रंगून गेले होते. बोचऱ्या थंडीत सकाळी नऊला स्पर्धेला सुरुवात झाली. तीन पिढ्याला जोडणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने मुलांबरोबर पालकांमध्येही चित्रकला स्पर्धेबाबत उत्सुकता होती. पाल्यांसोबत त्यांचे वडील, आई तसेच आजी-आजोबाही केंद्रांवर उपस्थित होते.
जगातील सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. गेली ३७ वर्षे सातत्‍याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे कोरोना संसर्ग काळातही ऑनलाईन माध्यमातून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. पहिली ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्‍यांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने कुंचल्‍यातून भावविश्‍व रेखाटता आले. यंदा पालकांसह आजी-आजोबांनीही ऑनलाईन माध्यमातून चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. पहिली ते दुसरी या अ गटातील विद्यार्थ्यांनी त्‍यांची आवडती कार्टून, वाढदिवसाचा केक या चित्रांना पसंती दिली. तिसरी ते चौथी या ब गटातील विद्यार्थ्यांनी पाण्यात पोहणारे मासे, घर आदी चित्रे काढली. पाचवी ते सातवी या क गटातील विद्यार्थ्यांनी क्रिकेट खेळणारी मुले या चित्राला सर्वाधिक पसंती दिली. आठवी ते दहावी या ड गटातील विद्यार्थ्यांनी पाण्याखालील जीवसृष्‍टी, गोशाळा, बाजारपेठेत मास्क घालून फिरणारे नागरिक आदींची चित्रे रेखाटली होती. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, कनेडी माध्यमिक विद्यामंदिर, माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, टोपीवाला हायस्कूल मालवण, श्रीराम मोरेश्‍वर हायस्कूल देवगड, माध्यमिक विद्यालय शिरगाव, जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी, मळगाव हायस्कूल, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चराटा, व्ही. एन. नाबर इंग्‍लिश स्कूल बांदा, सैनिक शाळा आंबोली, वेंगुर्ले हायस्कूल, कुडाळ हायस्कूल, बॅ. नाथ पै सेंट्रल शाळा कुडाळ, जनता विद्यालय तळवडे आणि श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या केंद्रांवर स्पर्धा झाली.