
जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक भारतीचा अखेरपर्यंत लढा
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारतीचा अखेरपर्यंत लढा
आमदार कपिल पाटील; शिक्षण देऊ शकत नाहीत, ते विकास काय करणार ?
रत्नागिरी, ता. 22 ः समाजवादाचे तत्व व तत्वांना तिलांजली देत सर्वच सत्ताधाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. पेन्शन योजना देण्यासाठी निधी नसल्याचे कारण सांगितले जाते; परंतु महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गरीब राज्यांमध्ये पेन्शन योजना सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना सुरू केलीच पाहिजे. या मागणीसाठी शिक्षक भारती अखेरपर्यंत लढत राहील, असे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार धनाजी पाटील, शिक्षक भारतीचे हिराजी पाटील, नीलेश कुंभार, संजय पाथरे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आदी उपस्थित होते. ते म्हणाले, कोकण शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीमार्फत खेडचे निवृत्त मुख्याध्यापक धनाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. खरी लढत धनसत्ता, दंडेलशाही, सत्ताधारी यांच्याविरोधात आहे; परंतु धनाजी पाटील हे सर्वसामान्य शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे सर्वसामान्य शिक्षक त्यांनाच विधान परिषदेत पाठवतील. राज्य सरकारने शिक्षणासाठी आवश्यक अनुदान देण्याची घोषणा केली. त्याचा शासन निर्णय काढला नाही. केवळ घोषणाबाजी करणे एवढेच या सरकारचे काम आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा उमेदवारच विजयी होईल.
कोट
रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना साधी एक शिक्षण संस्था काढता आली नाही. जे मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. ते म्हणतात मी विकास करतोय. बिघडलेल्या राजकारणाचे नेतृत्व करणारे कोकणचा विकास करु शकत नाहीत.
- कपिल पाटील, आमदार