लोककलावंतांना लोककला कट्ट्यात सहभागी होण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककलावंतांना लोककला कट्ट्यात सहभागी होण्याचे आवाहन
लोककलावंतांना लोककला कट्ट्यात सहभागी होण्याचे आवाहन

लोककलावंतांना लोककला कट्ट्यात सहभागी होण्याचे आवाहन

sakal_logo
By

५ फेब्रुवारीला लोककला सांस्कृतिक महोत्सव

चिपळूण, ता. २४ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव होत आहे. या लोककला कट्ट्यात आपली कला सादरीकरणासाठी जिल्ह्यातील इच्छुक लोककलावंतांनी ३० जानेवारीपर्यंत आयोजकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्टअंतर्गत (कै.) बापू बाबाजी सागावकर मैदानात महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. या महोत्सवात अनेक लोककला आणि लोकपरंपरा यांचे सादरीकरण होणार आहे. गेले सहा महिने महोत्सवाची तयारी सुरू असून या अंतर्गत कोकणातील पारंपरिक गीतांची स्पर्धाही घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष महोत्सवात पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक लोककला आणि लोककलावंत यांना मुख्य सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे. सलग चार रात्री हा कार्यक्रम रंगणार आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लोककला आणि लोककलावंत यांच्यासाठी ५, ६ व ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी चार ते सहा या वेळेत ‘लोककट्टा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोककलांचे सादरीकरण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांना आवाहन करण्यात येत आहे.

या लोककट्ट्यासाठी कलाप्रकार पारंपरिक असावा. तो पारंपरिक पद्धतीने सादर करण्यात यावा. वैयक्तिक वा सांघिक पद्धतीतील लोककला लोककट्ट्यावर सादर करण्यासाठी पाच ते पंधरा मिनिटे वेळ दिला जाईल. जिल्ह्यातील नमन, भारूड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, गज्जो, कातकरी, आदिवासी, मुस्लिम वा इतर धर्मीय पारंपरिक लोकगीते, उखाणे, ओवी, भलोरी, लग्नगीते, बारसा गीते, जलसा, गायनपार्टी वा अन्य प्रकारची विधीगीते सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. सर्व सहभागी कलाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह दिले जाईल. लोककलेच्या संदर्भग्रंथात यातील उत्कृष्ट लोककलांचा समावेश करण्याचे आयोजकांच्या विचाराधीन आहे. ज्या लोककलावंतांना लोककट्ट्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोककट्टा प्रमुख राष्ट्रपाल सावंत, स्नेहा ओतारी, महम्मद झारे, कैसर देसाई, अमिता टिकेकर यांच्याशी संपर्क साधावा.