नोकरी शोधणारे नव्हे, देणारे उद्योजक व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरी शोधणारे नव्हे, देणारे उद्योजक व्हा
नोकरी शोधणारे नव्हे, देणारे उद्योजक व्हा

नोकरी शोधणारे नव्हे, देणारे उद्योजक व्हा

sakal_logo
By

77696
कुडाळ ः मराठा समाज स्नेहसंमेलनात बोलताना इंद्रजित सावंत. व्यासपीठावर वासुदेव नाईक, पी. के. गावडे, शशिकांत गावडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

नोकरी शोधणारे नव्हे, देणारे उद्योजक व्हा

इंद्रजित सावंत ः कुडाळमध्ये मराठा समाज स्नेहसंमेलन उत्साहात


कुडाळ, ता. २३ ः मराठा समाजातील तरुणपिढी नोकरी करणारी न होता नोकरी देणारी उद्योजक पिढी झाली पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी मराठा समाजाच्या स्नेहसंमेलन मेळाव्यात केले. यावेळी विविध क्षेत्रांतील यश संपादन केलेल्यांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला
सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज स्मारक सभागृह, मराठा वैभव रंगमंच, कुडाळ येथे झाला. यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक पी. के. गावडे, समाजाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, सतीश सावंत, विठ्ठल नाईक, भाई तळेकर, राजू परब, दिवाकर दळवी, नंदू गावडे, बाळकृष्ण परब, आर. एल. परब, डॉ. दीपाली काजरेकर, चंदू कदम, के. बी. परब, स्वाती सावंत, सुभाष सावंत-प्रभावळकर, मेघना राऊळ, गुरुनाथ धुरी, पंढरीनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, ‘‘सावंतवाडी मराठा संस्थानचा हा मेळावा संपूर्ण जिल्ह्याचा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी आता नोकरीच्या मागे न लागता परीक्षेनंतर स्वतःच्या व्यवसायाकडे वळा. नोकरी शोधणारे बेरोजगार नको तर नोकरी देणारे उद्योजक मराठा समाजातून निर्माण झाले पाहिजेत. यासाठी अण्णासाहेब पाटील व सारथी संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या दोन्ही संस्थांकडे व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात बिनव्याजी कर्ज मिळत आहे. त्याचा लाभ घ्या. मराठा समाज हा रक्षण करणारा समाज आहे, आरक्षण मागणारा नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकायचे आहे, त्यांनी पुढे यावे. समाज नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे. हे सर्व करत असताना मराठा समाजाला ऐतिहासिक स्थान मिळवून द्या. प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल संपादन करा.’’
जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक पी. के. गावडे म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ घ्या. नैसर्गिक साधन समृद्धीचा वापर करून मासे व फळप्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करा. निसर्गभूमीतच आपण आपला विकास करू शकतो, याचा अभ्यास करा. गोड्या माशांचे संवर्धन हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. आज या ठिकाणी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात काम करत असताना आपण मात्र पारंपरिक व्यवसाय सोडून आळशी बनलो आहोत. हा आळस झटकून जोमाने काम करा. पंतप्रधान, मुख्यमंत्री योजनांच्या माध्यमातून अनेक व्यवसाय आहेत. समाजाचे सदैव मार्गदर्शन लाभेल.’’ गटविकास अधिकारी नाईक यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीसह आत्मविश्वास जोपासून वाटचाल करावी. ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला. निवेदन स्वाती सावंत, मेघना राऊळ यांनी केले. स्वागत सहायक गटविकास अधिकारी परब यांनी, प्रास्ताविक आर. एल. परब यांनी केले. समाजकार्य अहवाल वाचन सतीश सावंत यांनी केले. गुरुनाथ धुरी यांनी आभार मानले. बालवाडी विद्यार्थ्यांच्या पसायदानाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
..............
चौकट
मान्यवरांचे सत्कार
यावेळी मान्यवरांना मराठा समाज गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कदम, भरत गावडे, विशाखा पालव, संजय घोगळे, शेतकरी नारायण गावडे, शैक्षणिक कार्यकर्ते विवेकानंद बालम, रघुनाथ अंकुश घोगळे, स्नेहलता घोगळे यांच्यासह ७५ वर्षपूर्तीनिमित्त विठ्ठल नाईक यांना सन्मानित करण्यात आले.