‘स्टॉल हटाओ’मुळे वैभववाडीत खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्टॉल हटाओ’मुळे वैभववाडीत खळबळ
‘स्टॉल हटाओ’मुळे वैभववाडीत खळबळ

‘स्टॉल हटाओ’मुळे वैभववाडीत खळबळ

sakal_logo
By

77759
वैभववाडी ः येथील नगरपंचायत कार्यालयाबाहेर निवेदन देण्यासाठी स्टॉलधारक जमले होते.

77760
वैभववाडी ः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्याकडे निवेदन दिले.


‘स्टॉल हटाओ’मुळे वैभववाडीत खळबळ

नगरपंचायतीची नोटीस; ५० हुन अधिक जणांना फटका बसणार असल्याने अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ ः वैभववाडी-सडुरे आणि जुना कोकिसरे रस्त्याकडेला असलेल्या ५० हून अधिक स्टॉलधारकांना स्टॉल हटाओची नोटीस नगरपंचायतीने काढली आहे. त्यामुळे स्टॉलधारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नगरपंचायतीच्या भूमिकेविरोधात एकवटलेल्या स्टॉलधारकांनी नगरपंचायत परिसरात शिवसेनेचे पदाधिकारी पाहिल्यानंतर तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे शिवसेनेने स्टॉल हटवू नये, म्हणून स्वतंत्र निवेदन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे दिले.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत क्षेत्रात अनेक कोट्यवधी रूपये निधीची कामे मंजुर झाली आहेत. यामध्ये नगरपंचायत समोरील वैभववाडी-सडुरे रस्ता रूंदीकरण आणि फुटपाथ तयार करणे आणि जुना कोकिसरे रस्ता आणि फुटपाथ तयार करणे या महत्वपूर्ण कामाचा समावेश आहे. या दोन्ही रस्त्यांलगत अनेक स्टॉल आहेत. याशिवाय अनेकांनी संरक्षक कठडे रस्त्यावर अतिक्रमण करून उभारले आहेत. त्यामुळे रस्त्यालगत असलेले स्टॉल हटविणे अथवा संरक्षक कठडे हटविल्याशिवाय नगरपंचायतीला हे काम करणे शक्य नसल्याने नगरपंचायतीने ५० हून अधिक स्टॉलधारकांना स्वतःहुन स्टॉल हटविण्याची नोटीस काढली आहे. स्वतः स्टॉल न हटविल्यास नगरपंचायतीच्या माध्यमातून स्टॉल हटविण्यात येतील, असे स्पष्ट केल्यामुळे स्टॉलधारकांमध्ये खळबळ माजली आहे. नगरपंचायतीने घेतलेल्या भूमिकेविरोधात गेले दोन तीन दिवस स्टॉलधारकांच्या छुप्या बैठका सुरू होत्या. या बैठकानंतर आज तीस ते पस्तीस स्टॉलधारक नगरपंचायतीच्या या भुमिकेविरोधात नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकवटले. नगरपंचायतीने स्टॉल हटाओ भूमिकेबाबत पुर्नविचार करावा, अशा स्वरूपाचे ते निवेदन देणार होते; परंतु, त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप रावराणे, मनोज सावंत, तालुकाप्रमुख मंगेश लोके, सुनील रावराणे हे देखील स्टॉल हटाव मोहीमेच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिल्यानतंर जमलेल्या स्टॉलधारकांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांना निवेदन दिले. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी श्री. कांबळे यांनी विकासकामात अडथळा ठरणारे स्टॉल, कपाऊंड हटविण्याशिवाय पर्याय नाही. या दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च झाला नाही तर तो परत जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टॉलवरच स्टॉलधारकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना पर्यायी जागा द्यावी, त्यानंतर स्टॉल हटवावे, अशी मागणी केली. परंतु, पर्यायी जागेचा विचार करता येईल. पण, तोपर्यत विकासकामे थांबविता येणार नाही, असे सांगत श्री. कांबळे हे स्टॉल हटाववर ठाम राहिले. त्यामुळे वैभववाडीतील स्टॉल लवकरच हटविण्यात येणार हे निश्चित झाले आहे.
------------
कोट
अनेक गोरगरीब स्टॉलधारकांची रोजीरोटी स्टॉलवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे पहिले पुनर्वसन करा आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या, अशी आमची मागणी आहे. मात्र, सत्ताधारी स्वतःच स्टॉल हटावकरीता आग्रही आहेत आणि त्याचे खापर मात्र विरोधकांवर फोडत आहेत.
- प्रदीप रावराणे, नगरसेवक, ठाकरे शिवसेना
----------
कोट
विकासकामांत अडथळा ठरलेली अतिक्रमणे हटविल्याशिवाय शहरातील विकासकामे करता येणार नाहीत. त्यामुळे ती हटविण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्यासमोर नाही. शहरातील विकासकामे आता थांबविता येणार नाहीत.
- सुरज कांबळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाभवे वैभववाडी
----------
चौकट
असा होईल परिणाम
नगरपंचायत समोरील आणि दत्तमंदीर परिसरातील सर्व स्टॉल, जुना कोकिसरे रस्त्यानजीकचे सर्व स्टॉल आणि काही घरासमोरील संरक्षक कठडे हटविण्यात येणार आहेत. हे स्टॉल हटविल्यास ५० हुन अधिक कुटुंबाचा रोजगारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. तुर्तास त्यांना पर्यायी जागा बाजारपेठेत उपलब्ध नाही.
----------
पॉईटर्स
अशी आहे स्थिती?
* बाजारपेठेतील शासकीय जागेवर १२० हुन अधिक स्टॉल
* पंधरा वर्षापूर्वी तहसिल कार्यालय रस्त्यावर स्टॉलधारकांना पर्यायी जागेचा प्रस्ताव
* नगरपंचायत निर्मितीनंतर स्टॉलमध्ये झपाट्याने वाढ
* मालकी एकाची आणि स्टॉलचा वापर दुसऱ्याचा अनेक स्टॉल
* स्टॉल हटाव मोहीमेला राजकीय वळण लागण्याची शक्यता