
‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त मालवणमध्ये अंतर्गत वाद
77781
मालवण ः पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त
मालवणमध्ये अंतर्गत वाद
फलक फाडला, कार्यालयाला टाळे
मालवण, ता. २३ : शहरातील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनीच पदाधिकाऱ्यातील अंतर्गत वाद उफाळून आला. कार्यालयाबाहेर असलेला पक्षाचा मोठा फलक यावेळी फाडून कार्यालयासमोर गोळा करून ठेवण्यात आला. या वादानंतर कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले. पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वाद वाढला व त्यातून ही घटना घडल्याचे समजते. यासंदर्भात काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांना कळविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षांतर्गत घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आता वरिष्ठ कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे; मात्र या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.