
कुडाळातील ''त्या'' गॅस स्टोरेज प्रकल्पाचे स्थलांतरण करा
कुडाळातील ‘त्या’ गॅस स्टोअरेज
प्रकल्पाचे स्थलांतरण करा
---
चांदणी कांबळी; जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः कुडाळ नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मीवाडी येथे गॅस साठवणूक करण्यासाठी उभारलेला स्टोअरेज हाऊस प्रकल्प अडचणीचा ठरत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा गॅस स्टोअरेज हाऊस प्रकल्प लोकवस्ती तसेच वर्दळीच्या जागेतून स्थलांतरित करावा किंवा येथील प्रकल्प रद्द करावा; अन्यथा २६ जानेवारीला उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका चांदणी कांबळी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की हा प्रकल्प लोकवस्तीत असून, ५० मीटर अंतराच्या आत राहती घरे, जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा, नाथ पै शाळा, तसेच महालक्ष्मी मंदिर आहे. कुडाळ बाजारपेठेला महामार्गापासून जोडणारा मुख्य रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात ये-जा या मुख्य रस्त्याने होत असते. रस्त्यापासून दोन ते तीन मीटर अंतरावर हा प्रकल्प उभारला गेला आहे. या मुख्य मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणूक व नरकासुर दहन या उत्सवाबरोबर लग्न वरात वगैरे नेहमी होत असतात. त्यामुळे होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भविष्यात धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिक नागरिकांना भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी स्थानिक रहिवासी तसेच लोकप्रतिनिधी तीव्र विरोध केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता हा प्रकल्प या ठिकाणी राबवू नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करून लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतरित करावा. जबरदस्तीने हा प्रकल्प या ठिकाणी राबविला गेल्यास येत्या २६ ला स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी मिळून उपोषणास बसणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.