
माडावरुन पडल्यामुळे ओटवणेत एकाचा मृत्यू
77831
दीनानाथ कविटकर
माडावरुन पडल्यामुळे
ओटवणेत एकाचा मृत्यू
ओटवणे, ता. २३ ः नाराळ काढताना माडावरुन पडल्याने ओटवणे येथील एकाचा मृत्यू झाला. दिनानाथ गणपत कविटकर (वय ६३ रा. ओटवणे-भटवाडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ओटवणे-देऊळवाडी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की ः दिनानाथ कविटकर हे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ओटवणे-देऊळवाडी येथे नारळ काढण्यासाठी गेले होते. ते माडावर चढत असताना हात सुटून सुमारे ४०-४५ फूट खाली जमिनीवर जोरदार आदळले. स्थानिकांनी लागलीच त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. ते नारळ काढण्यासाठी ओटवणे दशक्रोशीतील गावांसहित गोवा राज्यात देखील ठराविक बागायतदारांकडे जात असत. ते नारळ पाडपी म्हणून बरीच वर्षे काम करत होते. परंतु, आज नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कविटकर कुटुंबीयांना धक्काच बसला. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार मनोज राऊत, पी. जी. नाईक यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देत या घटनेची माहिती घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परीवार आहे. येथील प्रसाद कविटकर यांचे ते वडील होत तर भाजपचे जिल्हा पदाधिकारी दादू कविटकर, तुळशीदास कविटकर, टेम्पो चालक प्रकाश कविटकर यांचे ते भाऊ होत.