खेड ः भुयारी मार्गाचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः भुयारी मार्गाचे काम रखडले
खेड ः भुयारी मार्गाचे काम रखडले

खेड ः भुयारी मार्गाचे काम रखडले

sakal_logo
By

rat२४p२८.jpg ः KOP23L78024 खेड ः मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाट

rat२४p२९.jpg ः OP23L78025 कशेडी घाटातून माग काढताना वाहने


भरणे ते कशेडी समस्याग्रस्त भाग ३ ..................लोगो

भुयारी मार्ग रखडल्याने वाहतूक घाटातूनच

कशेडीतील अवघड वळणे धोकादायक ; दुरुस्तीकडे दुर्लक्ष

सिद्धेश परशेट्ये ःसकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना अवघड आणि धोकादायक कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे; मात्र या मार्गाचेच काम गेले वर्षभरापासून रखडले असून कशेडी घाटात होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी जात आहे. त्यामुळे या घाटात अपघाताची मालिकाच सुरू असते.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाची रचना अतिशय विचित्र आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत असलेला घाट हा नागमोडी वळणे आणि चढणीचा तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणार घाटाचा भाग हा नागमोडी वळणे आणि तीव्र उताराचा आहे. दोन्ही बाजूच्या घाटपरिसरामध्ये खेड तालुक्याच्या हद्दीत डाव्या बाजूला तर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत उजव्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे या घाटात वाहने हाकताना चालकांची अक्षरशः कसोटी लागते. कशेडी घाटातील भुयारी मार्गाचे काम सुरू होण्याआधी घाटरस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात होती. घाटात पडलेलेले खड्डे महामार्ग बांधकाम विभागाकडून तत्काळ बुजवले जात होते; मात्र भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यापासून घाटाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने घाटातील अपघातांचा धोका आणखीनच वाढला आहे.
घाटातील अपघात रोखण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणा दरम्यान या घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाचा ठेका घेतलेल्या रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने मार्च २०१९ मध्ये रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते कामाचा आरंभ केला. २०२१ अखेर भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे त्या वेळी ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले होते; मात्र २०२३ साल उजाडले तरी हे काम पूर्ण झाले नसल्याने आजही कशेडी घाटातूनच वाहतूक सुरू आहे.

चौकट
बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण
या संदर्भात हायवेचे अधिकारी गोसावी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. फिनिशिंगचे काम बाकी असून, येत्या मे महिन्यापर्यंत एक लेन सुरू करून गणेशोत्सवादरम्यान दुसरी लेन सुरू होईल तर भोस्ते घाटातील अवघड वळणाचे काम हे प्लॅनप्रमाणे करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.