
‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदू राष्ट्र’!
78026
पिंगुळी ः म्हापसेकर तिठा येथे धर्मध्वजाचे पूजन करून फेरीला प्रारंभ करण्यात आला. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदू राष्ट्र’!
कुडाळनगरी घोषणांनी दुमदुमली; ‘हिंदू जनजागृती’तर्फे राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदू राष्ट्र’ अशा घोषणा देत भगवा ध्वज लावलेल्या दुचाकींसह निघालेल्या वाहनफेरीने कुडाळ शहर दुमदुमून गेले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारीला शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली. सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी हिंदू बांधवांना देण्यात आले.
म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे धर्माभिमानी यशवंत परब गुरुजी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. आदित्य चिंचळकर यांनी पौराहित्य केले. तेर्सेबांबर्डे सरपंच रामचंद्र परब यांनी धर्मध्वजाला हार अर्पण केला. त्यानंतर धर्माभिमानी विवेक पंडित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फेरी मार्गस्थ झाली. जिजामाता चौक येथे फेरीची सांगता झाली. या फेरीत भाजपचे राजू राऊळ, बंड्या सावंत, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, गिअर पिंगुळीचे संचालक साईराज जाधव, घनःश्याम परब, सागर वालावलकर, रजत बबडी, संदेश शेलटे, स्वप्नील तेली, आदित्य राऊळ, सदा घाडी, पंकज गावडे, प्रख्यात काणेकर, प्रथमेश डिगसकर आणि रमाकांत नाईक यांच्यासह १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. सांगतेच्या वेळी जिल्हा समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी हिंदू जनजागृती समिती सभांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. हिंदूंवरील विविध संकटांपासून रक्षण करण्यासाठी हिंदू राष्ट्राची आवश्यकता आहे. याविषयी जागृतीसाठी कुडाळ सभेत सहभागी व्हा, असे आवाहन केले.
................
चौकट
पोलिसांचे फेरीसाठी सहकार्य
फेरीच्या प्रारंभी पिंगुळी तिठा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात वाहनफेरी आणि राष्ट्र-जागृती सभा यांच्या यशस्वीतेसाठी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गार्हाणे घालण्यात आले. फेरीच्या मार्गात कुडाळ येथे डॉ. गुरुप्रसाद सौदत्ती आणि रामचंद्र उपाख्य, दादा बल्लाळ यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्याला सद्गुरु सत्यवान कदम यांनी, तसेच जिजामाता चौक येथील जिजाऊंच्या पुतळ्याला भाजपचे राजू राऊळ, हेमंत जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. फेरीच्या प्रारंभापासून सांगतेपर्यंत कुडाळ पोलिसांचे चांगले सहकार्य लागले.