
चिपळूण ः एकता विकासमंचद्वारे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पान 2
चिपळूणमध्ये २९ ला
मोफत महाआरोग्य शिबिर
एकता विकासमंच; लाभ जास्तीत जास्त स्त्रियांना
चिपळूण, ता. २४ ः चिपळूण एकता विकासमंचाद्वारे मोफत महाआरोग्य शिबिर व औषध वितरण कार्यक्रमाचे २९ जानेवारीला परांजपे हायस्कूल चिपळूण येथे आयोजन करण्यात आले आहे. सहजीवन, सद्विचार, संघटन संजीवन या सामाजिक मूल्यांचे उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेल्या चिपळूण एकता विकासमंचाद्वारे हा पहिला उपक्रम राबवला जात आहे. निरोगी आरोग्य हाच समृद्ध जीवनाचा मुलाधार आहे. यासाठी समाजातील विविध गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे अनेक लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन चिपळूण एकता विकासमंचाद्वारे केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये डॉ. हर्षद होन (मधुमेह, हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. गौतम कुलकर्णी (मधुमेह, हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. सद्गुरू पाटणकर (सर्जन), डॉ. भक्ती पालांडे (सर्जन), डॉ. अब्बास जबले (अस्थिविकारतज्ज्ञ), डॉ. अमोल निकम (स्त्रीविकार तज्ञ), डॉ. पूजा यादव (स्त्रीविकारतज्ज्ञ), डॉ. राधा मोरे (आयुर्वेदाचार्य), डॉ. रजनीश रेडीज (मेडिकल ऑफिसर), डॉ. श्रद्धा घाग (मेडिकल ऑफिसर) या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांद्वारे रुग्ण तपासणी केली जाणार आहे.
सर्व स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त स्त्रियांना व्हावा यासाठी महाआरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ व अनुभवी महिला डॉक्टरांचा समावेश केला आहे. या शिबिरातील शिबिरार्थींसाठी फक्त मोफत तपासणीच नव्हे तर गरजू घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी चिपळूण एकता विकासमंच कटिबद्ध आहे. यासाठी सोनोग्राफी, सिटीस्कॅन, टुडी इको या चाचण्यांवर विशेष सवलत, कोकण रेल्वे कर्मचारी, माजी सैनिक, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत उपचार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (केशरी, पिवळे रेशनकार्ड) असणाऱ्या नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळणार आहेत. हे शिबिर हृदयरोग, मधुमेह, सांधेदुखी, दमा, श्वसनविकार, कर्करोग, महिलांचे आजार अशा रुग्णांसाठी व तत्सव रोगांची लक्षणे असणाऱ्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला, वैयक्तिक समुपदेशन, मोफत औषधे, सवलतीच्या दरात तपासण्या व उपचार या सर्व लोकाभिमुख बाबींमुळे हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. शिबिरार्थीने नावनोंदणीकरिता शिरीष काटकर, वसंत उदेग, मनोज शिंदे, किसन चिपळूणकर, डॉ. यतीन जाधव यांच्याशी संपर्क साधावा.