संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

ठाकरे यांच्या जयंतीला
पाच हजार महिलांचा सहभाग
रत्नागिरी ः शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. राजन साळवीच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीसह राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात २३ जानेवारीला जल्लोषात कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे ५ हजारापेक्षा जास्त महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालय येथे पूजा, रिमांडहोम व वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट वाटप, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ७पर्यंत हळदीकुंकू असे आयोजन करण्यात आले होते तसेच राजापुरात सकाळी १० वा. शिवसेना नेते तथा आमदार डॉ. साळवी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण, सकाळी १०.३० वा. राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप व शिवसेनाभवन, राजापूर येथे महिला आघाडीच्यावतीने दुपारी ३ ते ५ हळदीकुंकू, लांजात सकाळी १० वा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. साखरपा जिल्हा परिषद गटमध्ये बॅडमिंटन स्पर्धा व महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राजापूर, लांजा व रत्नागिरीवासिय शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
---------

पाग रिक्षास्टँड परिसरात
नाल्याची भिंत ढासळली
चिपळूण ः चिपळूण शहरातील पाग रिक्षास्टँड परिसरात असलेल्या नाल्याची संरक्षक भिंत ढासळली असल्याने ती धोकादायक बनली आहे. गुरुवारी रस्त्याचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार थेट त्या नाल्यात गेला. हा प्रकार समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्याला नाल्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे स्थानिक नागगरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. येथे तीन साईडने रस्ते गेले असल्याने कधी कोणती गाडी कशी येईल, याचा अंदाज करता येत नाही. रस्त्यालगत असणार्‍या नाल्यावर संरक्षण भिंत उभारून मिळावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे.


कचरा डेपोमुळे सात गुरांचा मृत्यू
मंडणगड ः मंडणगड येथील पंचायतीच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील कोंझर येथे वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या विनासंरक्षक भिंतीच्या कचरा डेपोतील कचरा मंडणगड-धनगरवाडी, कोंझर-मिरकटवाडा व पाले परिसरातील गुरांनी खाल्ल्याने ७ गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत संबंधित गुरांच्या मालकांनी पंचनामा करत भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नगर पंचायत प्रशासनास कळवले आहे; मात्र याची दखल घेण्यात न आल्याने पशुपालक व शेतकर्‍यांनी नगर पंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात नगर पंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
----

१० टक्केच आंबा कलमे मोहरली
रत्नागिरी ः सातत्याने बदलणार्‍या हवामानाचा शेतीपिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील हापूस आंब्यावरदेखील या हवामानाचा परिणाम होत आहे. कोकणातल्या हापूस आंब्याचे चक्र बिघडले आहे. आजतागायत केवळ १० टक्के आंब्याच्या झाडांवरती मोहोर आला आहे. त्यामुळे यंदा हापूस अर्थचक्र बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान हापूसचा तुटवडा भासणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी दिली आहे तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर न आल्यास हापूसवरती असलेले अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूसची अपेक्षित मोहोर प्रक्रिया न झाल्यास कामगारांना त्यांचा त्या दिवसापर्यंतचा हिशोब देऊन घरी पाठवलं जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तब्बल १ लाख टक्क्याहून अधिक जमिनीवर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.


नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पाहात आहे का?
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पाहात आहे का, असा सवाल खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उपस्‍थित केला आहे. रायगड जिल्ह्यात रेपोलीजवळ (गुरुवारी) पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. यावर खेडेकर यांनी अत्यंत कडवट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या रस्ते अपघातांना केवळ वाहनचालक जबाबदार नाहीत. पोलिस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १५ वर्षे सुरूच आहे. जे काम झाले आहे ते सदोष आहे. वळणमार्ग, सेवारस्ते नाहीत. त्यामुळे रात्री वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अपघात होतात. या सर्व प्रकाराला जबाबदार असणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना त्‍यांनी दोषी ठरवले. या मार्गावर एखादा मोठा नेता अपघातात मरण पावला तरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहे का, असा प्रश्न त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.