क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat२४४०.txt
(पान ३ साठी)

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील वारे येथील रस्त्यावर दुचाकीची पादचाऱ्याला धडक झाली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गोपाळ कुळ्ये (रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री पावणेआठच्या सुमारास वारे रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शैलेंद्र वारेकर वारे येथून चालत जात होते. त्याचवेळी संशयित विजय कुळ्ये हे दुचाकीवरून भरधाव वेगाने गणपतीपुळे ते रत्नागिरी असे येत असताना त्याने पादचारी शैलेंद्र यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
--
ॲपे रिक्षा उलटून नऊ महिला जखमी

खेड ः हळदीकुंकूचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ॲपे रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खेड तालुक्यातील देवघर गावानजीक घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवघर येथील एका वाडीत हळदीकुंकूचा कार्यक्रम होता. त्याच गावातील वाक्षेपवाडी परिसरातील काही महिला एकत्रित ॲपे रिक्षामध्ये बसून या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीकुंकूचा कार्यक्रम आटोपून पुन्हा घरी येत असताना हा अपघात झाला. एका ॲपे रिक्षात नऊपेक्षा अधिक महिला बसल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हळदीकुंकूचा कार्यक्रम आटपून महिलांना घेऊन येणारी ॲपे रिक्षा अवघड मार्गावर उलटून अपघात झाला. सर्व जखमी महिलांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील जखमींची नावे अशी ः सरीता जयराम इंगळे (वय ६५, देवघर), मनाली मनोहर कदम (३८), कल्पना संदीप शिंदे (३२), पार्वती शंकर यादव (६५), पार्वती कृष्णा महागावकर (४०), शर्मिला शांताराम कदम (४०), सुगंधा भगवान इंगळे (६५), सुरेखा सुरेश शिंदे (५३), जोश्ना जनार्दन शिंदे (४५) असून सर्व देवघर तालुका खेड या एकाच गावातील आहेत.
-------

लोखंडी सळ्या चोरीचा प्रयत्न

चिपळूण ः शहरातील पाग पॉवरहाऊस येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाच्या कामाकरिता ठेवण्यात आलेल्या लोखंडी सळ्या अॅपे रिक्षात टाकून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश अनंत गमरे (३९), राजन विनायक पावसकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद चेतक कंपनीचे जयंतीलाल घेवरचंद नानेचा यांनी दिली आहे. यानुसार मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पुलाच्या कामाकरिता लागणारे लोखंडी साहित्य त्यापैकी काही सळ्या अॅपे रिक्षामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांना पकडण्यात आले. यानुसार या दोघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात पुन्हा दाखल झाला असून अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.
-
कामगारास मारहाण तिघांवर गुन्हा

चिपळूण ः महामार्गावरील पिलर बांधकामासाठी सळी घेऊन जाताना तिघा तरुणांनी एकास मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर बसस्थानकाजवळ घडली. या प्रकरणी येथील पोलिसठाण्यात तिघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सद्दाम अल्लाद्दीन हुसेन (२९, शिवाजीनगर) याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरशेखनाका ते युनायट हायस्कूलदरम्यान ठेकेदार ईगल कंपनीकडून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामास पिलर उभारले जात आहे. हुसेन व त्याचे सहकारी शिवाजीनगर कॅम्पमधून डीबीजे महाविद्यालयासमोरील पिलरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाताना ते कॅम्पबाहेर आले. या वेळी २० ते २२ वयोगटातील तिघे तरुण तेथे दुचाकीने आले आले. या वेळी हुसेन यांनी २ मिनिटे थांबण्यास सांगितले. याचा राग येऊन तिघांनी हुसेनला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यापैकी एकाने हुसेनच्या डोक्यात दगड घातल्याने तो जखमी झाला. हुसेनचा सहकारी नसहूल हक व टुटुल इस्लाम यालाही तिघांनी लोखंडी सळीने मारहाण करत शिवीगाळ केली. या घटनेत हुसेन व त्याचे सहकारी असे तिघेजण जखमी झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात तिघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
दाभोळे येथील वृद्धाचा मृतदेह सापडला

साखरपा ः नजीकच्या दाभोळे येथील अशोक बाउल (अंदाजे वय ६५) हे कोंडगाव येथील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव तिठ्यापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत सापडले. याबाबतची माहिती पोलिस पाटील मारुती शिंदे यांना समजताच त्यांनी साखरपा पोलिस यांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, हवालदार उगळे, तानाजी पाटील, पोलिस पाटील मारूती शिंदे घटनास्थळी हजर झाले. सुरवातीला ओळख पटवण्यात अडचण येत असताना पोलिस पाटील व साखरपा पोलिसांच्या प्रयत्नाने ओळख पटवण्यात यश आले व नातेवाइकांशी संपर्क साधून पोलिसांनी कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--