
सावंतवाडीत आज जलतरण स्पर्धा
78161
सावंतवाडी ः स्पर्धेविषयी माहिती देताना मिहीर मठकर. सोबत विनया बाड, प्रमोद भागवत, मयुरेश मळीक, धनराज पवार आदी.
सावंतवाडीत आज जलतरण स्पर्धा
‘रोटरॅक्ट’चा पुढाकार; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
सावंतवाडी, ता. २५ ः येथील जिमखाना मैदानावरील जलतरण तलाव मागील सहा वर्षांपासून बंद होता. तो उद्या (ता. २६) खुला होत असून प्रथमच रोटरॅक्टच्या माध्यमातून येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहीर मठकर यांनी दिली.
सावंतवाडी जिमखाना मैदानावरील पालिकेचा जलतरण तलाव सहा वर्षांपासून बंद होता. तो खुला करण्यात आला, जलतरणासाठी तो सुरू करण्यात आला नाही. उद्या तो खुला होत असून सहा वर्षांनंतर प्रथमच रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून युवकांसाठी जिल्हा पातळीवरील जलतरण स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. १०, १४, १९ व खुला वयोगटातील स्पर्धक असतील, असे मठकर यांनी सांगितले. यापुढे दरवर्षी रोटरॅक्ट क्लब जलतरण स्पर्धा घेईल, असे देखील ते म्हणाले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष विनया बाड, सेक्रेटरी प्रमोद भागवत, मयुरेश मळीक, धनराज पवार आदी उपस्थित होते.
येत्या २६, २७ व २८ जानेवारीला रोटरॅक्टच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यानंतर २७ ला रुग्णांसाठी सेफ बॅग वाटप करण्यात येणार आहे. ही क्षयरोग व कॅन्सर रुग्णांसाठी असून ती २०० पेक्षा जास्त रुग्णांना वाटप करण्यात येणार आहे. नवीन पद्धतीची मॉर्डन बॅग पुन्हा पुन्हा वापरता येईल. येत्या २८ ला रोटरॅक्ट लीडरशिप अवॉर्डच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले नॉलेज सिटीमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. सावंतवाडी रोटरॅक्ट क्लब, ठाणे रोटरॅक्ट क्लब, सावंतवाडी रोटरी क्लब, यशवंतराव भोसले नॉलेज सिटी यांच्या माध्यमातून रोटरॅक्ट क्लब लीडरशिप अवॉर्ड घेतले जाणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सतीश धामणकर मार्गदर्शन करणार आहेत, असे मठकर, विनया बाड यांनी सांगितले. भोसले नॉलेज सिटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात वेंगुर्ले होमिओपॅथिकच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असून १०० विद्यार्थी या कार्यक्रमास सहभागी होतील. त्यासाठी स्पर्धा देखील जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मठकर यांनी दिली.