रत्नागिरी-ठेकेदारांच्या अभावामुळे जलजीवन मिशनमध्ये ’खो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ठेकेदारांच्या अभावामुळे जलजीवन मिशनमध्ये ’खो’
रत्नागिरी-ठेकेदारांच्या अभावामुळे जलजीवन मिशनमध्ये ’खो’

रत्नागिरी-ठेकेदारांच्या अभावामुळे जलजीवन मिशनमध्ये ’खो’

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२५p२१.jpg- रत्नागिरी ः जलजीवनमधील पाणीयोजनेचे काम.
-------
ठेकेदारांच्या अभावामुळे ‘जलजीवन’मध्ये ’खो’
शंभर गावातील स्थिती ; निविदांना प्रतिसादच नसल्याने प्रशासनापुढे प्रश्‍न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः ‘हर घर नलसे जल’ या योजनेतील कामांना रत्नागिरी जिल्ह्यात खो बसला आहे. ठेकेदारांच्या अभावामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावातील शेकडो पाणीयोजनेच्या निविदा वारंवार प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळत नाही. एकाचेवळी दीड हजाराहून अधिक कामे जलजीवन योजनेतून केली जाणार असल्याने हा गोंधळ उडाला आहे. यावर उपाययोजना म्हणून स्थानिक पातळीवरील ठेकेदारांशी संवाद साधून सरपंचांनी कामे घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
जलजीवन मिशनमधील अडचणींवर मात करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, सरपंच, ग्रामविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जलजीवनची कामे सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
जीवन मिशन या अभियानातंर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पुरेसे, दर्जेदार व नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मार्च २०२४ अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा हर घर नलसे जल म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे. त्यानुसार ही कामे वेगाने पूर्ण व्हावीत अशा शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्याचा आराखडा ७०० कोटी रुपयांचा असून, सुमारे पंधराहून अधिक पाणीयोजनांची कामे आहेत. जिल्ह्यातील शंभर गावातील शेकडो कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. काही निविदा तीन ते चारवेळा प्रसिद्ध झालेल्या आहेत; पण त्यांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे ही कामे सुरू करणे अशक्य आहे. या संदर्भात सरपंचांनी पुढाकार घेऊन गावपातळीवर पाणीयोजनेची कामे घेणार्‍या ठेकेदारांची चर्चा करावी आणि ही कामे करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना सीईओंनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात पाणीयोजनेची कामे करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ठेकेदारांची संख्या कमी आहे. जलजीवनमधील कामांची संख्या सुमारे दीड हजाराहून अधिक आहे. त्यातील कामेही १० लाखाहून पुढे कोट्यवधीच्या दरम्यान आहेत. सध्या निविदा प्रसिद्ध झालेली कामे स्थानिक ठेकेदारांनी घेतली आहेत. काही ठेकेदारांकडे एकापेक्षा अधिक कामे आहेत. त्यामुळे आता प्रसिद्ध होणार्‍या निविदांना प्रतिसाद मिळत नाहीत. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे परजिल्ह्यातील ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. या ठिकाणी डोंगराळ भाग आणि कातळाची जमीन आहे. ही कामे करण्यासाठी मंजूर निधी कमी पडतो. स्थानिक ठेकेदारच ते करू शकतात. गुहागर आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक कामे निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने पूर्ण करता आलेली नाहीत. दरम्यान, जलजीवनचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाची सर्वच अधिकारी कामाला लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत थांबून कागदोपत्री कामे केली जात आहेत.
----
चौकट
तीनशेहून अधिक कामांना सुरवातच नाही
ठेकेदारांनी एकापेक्षा अधिक कामे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक कामांना सुरवातच झालेली नाही. एक काम पूर्ण झाले की, दुसरे सुरू करायचे, अशी भूमिका ठेकेदाराने घेतल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.