सावंतवाडीत डांबरीकरण रोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत डांबरीकरण रोखले
सावंतवाडीत डांबरीकरण रोखले

सावंतवाडीत डांबरीकरण रोखले

sakal_logo
By

78264
सावंतवाडी ः जुना बाजार करोल अवाट येथे सुरू असलेले डांबरीकरणाच्या कामाच्या ठिकाणी पाहणी करताना माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर. सोबत इतर. (छायाचित्र ः निखील माळकर)

सावंतवाडीत डांबरीकरण रोखले

निकृष्ट कामाचा आरोप; जुना बाजार करोल अवाट येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः जुना बाजार करोल अवाट येथे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम वादात सापडले आहे. जुन्या रस्त्यावर डांबर न मारता डांबरीकरणाचा थर टाकण्यात आल्याचा आरोप करत तेथील नागरिकांनी काम बंद पाडले. या कामाची सखोल चौकशी व्हावी, तोपर्यंत काम करण्यात येऊ नये, अशी मागणी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांनी केली आहे. प्राथमिक दर्शनी हे काम निकृष्ट दर्जाचे वाटत आहे. त्यामुळे ते थांबविण्यात आल्याचे पालिकेचे बांधकाम अभियंता मनोज राऊळ यांनी सांगितले.
शहरातील जुनाबाजार करोल अवाट परिसरात जिल्हा नियोजन निधीमधून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. आज सकाळी काम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी काम घेणार्‍या ठेकेदाराने खाली डांबराचा थर न घालता थेट हॉटमिक्स ओतून कामाला सुरवात केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील नागरिकांनी याबाबतची विचारणा केली. यावेळी तेथील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी तेथील संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी रचलेले डांबरीकरणाचे थर काढून बघितले. यावेळी त्या ठिकाणी फक्त हॉटमिक्स ओतल्याचा प्रकार दिसला. हा प्रकार पाहून त्या ठिकाणी माजी नगरसेविका सासोलकर यांनी धाव घेतली. त्यांनाही तेथे जमलेल्या नागरिकांनी हा प्रकार दाखवून दिला. यावेळी ते काम निकृष्ट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना त्या ठिकाणी बोलावून हे काम तत्काळ बंद करा आणि संबंधित ठेकेदाराला आवश्यक सूचना द्या तसेच या कामाची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यानुसार त्या ठिकाणी दाखल झालेले पालिकेचे अधिकारी राऊळ यांनी हे काम बंद करण्यास सांगितले. यावेळी तन्वीर शेख, सलीम शेख, शरफुद्दीन शेख उपस्थित होते.
................
कोट
जिल्हा नियोजनच्या निधीतून तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यामार्फत ही कामे मंजूर केली होती; परंतु कामे लवकर आटोपण्याच्या गडबडीत कशीही ओढून काढली जात आहेत. त्यामुळे कामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच वेळी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कामांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.
- उत्कर्षा सासोलकर, माजी नगरसेविका
.................
कोट
नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणी तपासणी केली असता कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. त्यामुळे तूर्तास ते काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे हा प्रकार घडला. त्यावेळी संबंधित ठेकेदार नव्हता. त्यामुळे त्यांच्या कामगारांकडून चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे काम आता थांबविले आले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
- मनोज राऊळ, बांधकाम अभियंता, पालिका