
कनेडी येथील राडाप्रकरणी 50 हून अधिक जणांवर गुन्हे
कनेडी येथील राडाप्रकरणी
५० हून अधिक जणांवर गुन्हे
शिवसेना-भाजप वाद; संशयितांमध्ये बडे नेते
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः कनेडी येथील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील राडाप्रकरणी परस्परविरोधात एकूण चार तक्रारी दाखल झाल्या. यात पोलिसांनी दिलेल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधातील तक्रारींचाही समावेश आहे. यात दोन्ही गटातील बड्या नेत्यांसह ५० हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनेडी येथे काल ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटांकडून पोलीसांत तक्रारी देण्यात आल्या. आजही या प्रकरणी पोलीसांसह आणखी एक तक्रार दाखल झाली. शिवसेना कार्यकर्ता कुणाल सावंत यांच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह चौघांवर तर गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत यांच्यासह २० ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कुंभवडे माजी सरपंच सूर्यकांत तावडे यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, सागर सावंत, श्रीकांत सावंत, संजय सावंत यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल झाला. तसेच या राड्यादरम्यान चार पोलिस जखमी झाले होते. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही बाजूच्या १६ जणांविरुद्ध पोलिस हवालदार राजेंद्र नानचे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.