
राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक सुनील बागल यांना जाहीर
78348
सुनील बागल
राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक
सुनील बागल यांना जाहीर
दोडामार्ग,ता.२५ ः येथील पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून दोन वर्षांपूर्वी सेवा बजावलेल्या सुनील विश्वास बागल यांची राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकासाठी (Police medal for gallantry) निवड झाली. सध्या ते गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
श्री. बागल हे सन २०२० मध्ये ऐन कोरोना कालावधीत दोडामार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत होते. कोरोना कालावधीत उद्भवलेल्या परिस्थितीवेळी त्यांनी दोडामार्गमध्ये उत्कृष्ठ काम केले होते. त्याच दरम्यान त्यांची पदोन्नती झाल्यानंतर स्वेच्छेने त्यांनी गडचिरोली येथे पोस्टिंग मागून घेतली होती. सध्या ते गडचिरोली येथे सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. २९ मार्च २०२१ रोजी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकी दरम्यान तब्बल ५ हत्यारबंद नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले होते. त्यांच्या या कामगिरीच्या अनुषंगाने त्यांना हे राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.