पान एक-शिक्षक मतदार संघासाठी सज्जता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-शिक्षक मतदार संघासाठी सज्जता
पान एक-शिक्षक मतदार संघासाठी सज्जता

पान एक-शिक्षक मतदार संघासाठी सज्जता

sakal_logo
By

78780
सिंधुदुर्गनगरी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

शिक्षक मतदारसंघासाठी सज्जता

उद्या मतदान ः जिल्ह्यात १९ केंद्रे निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी होणाऱ्‍या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात १९ केंद्रांवर प्रक्रिया राबवली जाणार असून, यासाठी २१६४ मतदार निश्‍चित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १४५६ पुरुष तर ७०८ महिला असे एकूण २१६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी २०३ कर्मचारी, तर आरोग्य सुविधेसाठी ३८ आरोग्य कर्मचाऱ्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला असून, मतदारांना सुटी देण्यात आली आहे. या मतदानासाठी ईव्हीएम मशिन न वापरता जुन्या पद्धतीने अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्रे सावंतवाडी तालुक्यात आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्‍या मतपत्रिका आणि पेट्या येथील नियोजन सभागृहातून उद्या (रविवारी) मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. तसेच, मतदान झाल्यावर त्या सर्व मतपेट्या पुन्हा जिल्हा नियोजन समिती सभागृहात जमा केल्या जाणार असून येथून त्या थेट कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पोलिस बंदोबस्तात पाठविल्या जाणार आहेत. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
००००
तालुकावार मतदार संख्या
देवगड २५०, वैभववाडी १३१, कणकवली ४२६, कुडाळ ३८२, मालवण २०४, सावंतवाडी ४६९, दोडामार्ग १२४, वेंगुर्ले १६६

ही आहेत मतदान केंद्रे
कोकण शिक्षक मतदारसंघात कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे अंतर्भूत असून ९८ मतदान केंद्रे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले या तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी, तर दोडामार्ग येथे भेडशी न्यू इंग्लिश स्कूल तसेच मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल खेमराज इंग्लिश स्कूल बांदा, आर. पी. हायस्कूल मसुरे, न्यू इंग्लिश स्कूल आचरा, वराडकर हायस्कूल कट्टा, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, माध्यमिक विद्यालय कासार्डे, रामेश्वर हायस्कूल मिठबाव, माध्यमिक विद्यालय पडेल अशी १९ निवडणुकीसाठी मतदान केंद्रे आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोळंकी हे असणार आहेत. मतदानाची सर्व तयारी झाली आहे, असेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.