
‘देवगड अर्बन’साठी आज मतदान
‘देवगड अर्बन’साठी आज मतदान
२२ जण रिंगणात; देवगड, कणकवली, कुडाळमध्ये १० केंद्रांवर प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ : येथील दी देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत १२ जागांसाठी उद्या (ता. २९) मतदान होणार आहे. यासाठी एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये देवगड तालुक्यासह कासार्डे (ता. कणकवली) आणि कुडाळ मिळून एकूण १० मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ११ हजार ५२४ मतदार निश्चित आहेत. देवगड तालुक्यातील सात व इतर सर्व तालुके मिळून एक असे एकूण आठ संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक असे एकूण १३ संचालक निवडून द्यायचे आहेत. १३ जागांसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. देवगड तालुका वगळुन उर्वरित तालुक्यांमधून सर्वसाधारणमध्ये एक जागा होती. या जागेवर एकच उमेदवारी आल्याने तेथे अनिल (बंड्या) वामन सावंत हे उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. त्यामुळे आता देवगड तालुक्यातील सात संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक असे एकूण १२ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. याकरिता उद्या मतदान होणार आहे. एकूण १० केंद्रांवर मतदान घेतले जाईल. यामध्ये देवगडमध्ये पाच मतदान केंद्रे आहेत. येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये पाचही मतदान केंद्रे आहेत. तालुक्यातील पडेल येथे दोन मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. तसेच नारिंग्रे, कासार्डे (ता. कणकवली) आणि कुडाळ येथे मतदान केंद्रे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) माणिक सांगळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) अनिल राहिंज काम पाहत आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. ३०) मतमोजणी होईल.
...................
चौकट
निडणुकीत चुरस
निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत शिवम् सहकार पॅनेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले आहे. एका मतदाराने एकूण १२ मते द्यायची आहेत. यासाठी एकूण पाच मतपत्रिका असतील.