
राजापूर अर्बन बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान
राजापूर अर्बन बॅंकेच्या
निवडणुकीसाठी आज मतदान
दोन पॅनेलमध्ये लढत; ३१ उमेदवार रिंगणात
राजापूर, ता. २८ः विद्यमान सत्ताधारी सहकार पॅनेलविरुद्ध परिवर्तन पॅनेल अशा रंगलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे मतदान रविवारी (ता. २९) होणार आहे. यामध्ये सुमारे १४ हजार ७०० मतदारांकडून ३१ उमेदवारांचे मतपेटीच्या माध्यमातून भवितव्य ठरवले जाणार आहे. शहरातील राजापूर हायस्कूलमधील मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे.
कोरोना महामारीसह अन्य विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राजापूर अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठी ९ जागा, महिला प्रतिनिधी २ जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी, इतर मागास प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि सर्वसाधारण-राजापूर तालुक्याबाहेरील शाखांसाठी अशी प्रत्येकी एक जागा अशा १५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्यामध्ये तालुक्याबाहेरील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित प्रत्येक जागेसाठी समोरासमोर लढत होत आहे.
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेल आणि सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलने उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पॅनेलकडून सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही पॅनेलकडून प्रचाराची चांगलीच राळ उडवण्यात आली होती. त्यामध्ये एकमेकांवर थेट आरोपांच्या फैरी झाडण्याऐवजी मतदारांच्या थेट भेटीगाठी घेण्यावर भर दिल्याचे चित्र दिसत होते.
या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राजापूर हायस्कूलमधील सहा मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून त्यामध्ये मतदार कोणाच्या बाजूने आपल्या मताचा कौल देणार? याकडे आता सार्यांचे लक्ष लागले आहे.