शिक्षणपद्धत बदलण्याचे भाजपाचे धोरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणपद्धत बदलण्याचे भाजपाचे धोरण
शिक्षणपद्धत बदलण्याचे भाजपाचे धोरण

शिक्षणपद्धत बदलण्याचे भाजपाचे धोरण

sakal_logo
By

शिक्षणपद्धत बदलण्याचे भाजपचे धोरण
आमदार जयंत पाटील यांचा आरोप; जुन्या पेन्शन योजनेबाबत शिक्षकांमध्ये नाराजी

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक--लोगो

रत्नागिरी, ता. २८ः शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यास शासनाने नकार दिला आहे. या प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या अनेक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध शिक्षकांच्या मनात प्रचंड राग आहे. भाजपचे शासन शिक्षणव्यवस्था हळुहळू नष्ट करण्याच्या तयारीत आहे. शासकीय शाळांचे बळ आणि दर्जा कमी करून खासगी इंग्लिश मीडियम स्कूलकडे मुलं वळवण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणपद्धतच बदलण्याचे धोरण भाजपने अंगीकारले आहे. त्याचा प्रचंड राग शिक्षकांच्या मनात असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल, असे या निवडणुकीचे प्रचारप्रमुख आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटील रिंगणात आहेत. त्याच्या प्रचारासाठी ते आले होते. विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदेश मयेकर आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, प्रचारप्रमुख असल्याने संपूर्ण कोकण आम्ही फिरत आहोत. बाळाराम पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टीडीएफ, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना पुरस्कृत बाळाराम पाटील हे उमेदवार आहेत. गेले १५ दिवस मालासरा ते आरोंद्यापर्यंत फिरतोय. प्रत्येक शाळा, संस्था आमचे स्वागत करून बाळाराम पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. पाटील आमदार म्हणून शिक्षकांचे प्रश्न संसदेत मांडत आहेत. जुनी पेन्शन योजना शिक्षकांना परत लागू करण्याची मागणी पाटील यांनी विधानसभेत केली होती; परंतु ही पेन्शन लागू केल्यास शासनाच्या तिजोरीवर सुमारे २ लाख कोटीचा बोजा पडेल आणि आता शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले; मात्र मी त्याला जोडून प्रश्न विचारला होता की, जर शासनाची आर्थिक परिस्थिती सुधारली तर ही पेन्शन योजना लागू होऊ शकेल का? या वेळी अर्थमंत्र्यांनी याला थेट नकार दिला.
कोकणातली अनेक मोठमोठ्या शिक्षणसंस्था या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या आहेत. त्यात आता शिवसेनेचीही भर पडल्यामुळे बाळाराम पाटील यांचा विजय निश्चित आहे. या वेळी शिवसेनेसह सर्वच पक्ष जोरात राबत आहेत. शेकापचा पाठिंबाही बाळाराम पाटील यांना आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाटील यांचा विजय निश्चित आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

चौकट
१७ आमदार अपात्र होण्याची शक्यता
ठाकरे सेना आणि शिंदेसेनेत सुरू असलेल्या वादावर वैयक्तिक मत मांडताना शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले, घटनेमध्ये असलेल्या तरतुदीनुसार पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. पक्षाने व्हिप बजावला असला आणि त्याच्याविरुद्ध काम केले असेल तर कारवाई होणारच. त्यामुळे शिंदे गटातील १७ आमदार अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.