
रत्नागिरी-सीसी टिव्ही फुटेजसंदर्भातील सावंतांचा अर्ज मान्य
पान १ साठी)
फुटेजसंदर्भातील
सावंतांचा अर्ज मान्य
स्वप्नाली सावंत मृत्यू्; तीन ठिकाणची फुटेज तपासणार
रत्नागिरी, ता. २८ : स्वप्नाली सावंत मृत्यूप्रकरणी मुख्य संशयित आरोपी सुकांत ऊर्फ भाई सावंत यांनी सीसीटीव्ही फुटेज संदर्भात केलेला रिव्हिजन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने अंशतः मंजूर केला आहे. १० सप्टेंबर २०२२ ला सायंकाळी ६ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी), शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहा, त्यात काही आढळल्यास संशयिताच्या मागणीनुसार न्याय दंडाधिकारी पुढील योग्य आदेश देऊ शकतात. ते फुटेज राखून ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भाई सावंत यांचे वकील फैसल डिंगणकर, मुद्दसर डिंगणकर आणि सचिन नाचनकर यांनी ही माहिती दिली. स्वप्नाली सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी भाई सावंत यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी भाई सावंत यांना चौकशीसाठी ८ सप्टेंबरला ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असतानाच स्वप्नाली सावंत हिची आई सौ. संगीता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला तक्रार दिली. भाई सावंतने १० सप्टेंबरला मला मिऱ्यावर सांगितले की, मी पत्नीचा (स्वप्नाली) खून करून तिचे तुकडे केले आणि ते जाळून राख समुद्रात फेकून दिली. मात्र, ८ सप्टेंबरपासून भाई सावंत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर १० सप्टेंबरला ते सासूला हे सर्व सांगायला मिऱ्यावर कधी गेले, असा सवाल भाई सावंत यांचे वकील फैसल डिंगणकर, मुद्दसर डिंगणकर आणि सचिन नाचणकर यांनी उपस्थित केला आहे.
या अनुषंगाने संशयित भाई सावंत यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करून डीवायएसपी कार्यालय, शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे १० सप्टेंबर २०२२ चे सायंकाळी सहाच्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्याबाबत केलेला रिव्हिजन अर्ज न्यायालयाने अंशतः मान्य केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संबंधित तारखेचे आणि त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज मुख्य संशयिताच्या म्हणण्यानुसार सुसंगत असेल तर सीसीटीव्ही फुटेजबाबत योग्य तो निर्णय न्याय दंडाधिकारी देऊ शकतात. त्यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवावे, असे आदेशात नमूद केले आहे.