
निरोगी आयुष्यासाठी वनौषधींची गरज
swt३०६.jpg
७९१६१
कुडाळः विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रशांत सामंत, प्राचार्य मुमताज शेख, विद्यार्थी, पालक व शिक्षक. (छायाचित्रः अजय सावंत)
निरोगी आयुष्यासाठी वनौषधींची गरज
डॉ. प्रशांत सामंतः कुडाळमध्ये विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः कुडाळ इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील मुलांनी साकारलेले वैज्ञानिक प्रयोग लक्षवेधी आहेत. विविध प्रतिकृतींसह विस्मृतीत गेलेला आजीबाईचा बटवा, विविध वनौषधी यांचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास आपण सर्वजण निरोगी आयुष्य जगू शकतो, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत सामंत यांनी आज विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. या प्रदर्शनात विविध वैज्ञानिक प्रतिकृती रांगोळी, वनौषधी, भाजी, फुले, फळे, सुका मेवा, मसाले, आजीबाईच्या बटव्यातील औषधे आदीची मांडणी केली होती.
कमशिप्र मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या वतीने प्राचार्य, शिक्षक व पालक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध प्रयोग साकारलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले होते. याचे उद्घाटन डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य मुमताज शेख, रियाज शेख, मिराली मयेकर, नेहा कुडाळकर, स्वाती चिंदरकर, वैशाली शेट्टी, अर्चना धुरी, सिद्धेश वेंगुर्लेकर, मोहिनी चव्हाण, सोनल सुर्वे, पूर्वा राऊळ, सूरज गोसावी, प्राजक्त चव्हाण, सोनल प्रभू, भावना धुरी, स्नेहा परुळेकर, कविता सबलपारा, झेबा आवटे, पूजा खानोलकर, स्नेहा गोसावी, भगवान केळुस्कर, जान्हवी नाईक, गार्गी गौसावी, रेजिना फर्नांडीस, केतकी गोसावी, सुप्रिया कुडाळकर, अर्चना पालव आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, "या विज्ञान प्रदर्शनात मुलांनी साकारलेले विविध प्रयोग विविध, वनौषधी या केवळ मुलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मुलांनी आपल्या कल्पक बुद्धीने साकारलेले प्रयोग लक्षवेधी आहेतच, शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात वेगळा आशेचा संदेश देऊन जातात. आपण या सर्व गोष्टींचे पालन केल्यास निरोगी आयुष्य जगू शकू. या प्रदर्शनात मुले व पालकांसाठी अभिप्रेत असणाऱ्या सर्वच गोष्टी विशेषतः वनौषधी, विविध फळे, मसाले, फुले या महत्वाच्या होत्या. सर्वांबरोबरच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण आजीबाईचा बटवा विसरत चाललो आहोत. त्याची आठवण या प्रदर्शनाच्या माध्यमातून करून देण्यात आली." आजीबाईचा बटवा आरोग्य सुदृढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विस्मृतीत गेलेल्या आजीबाईच्या बटव्याची सद्यस्थितीत गरज आहे, असे प्राचार्य मुमताज शेख यांनी सांगितले. या प्रदर्शनात मुलांनी साकारलेले लक्षवेधी अशा विविध १८ प्रतिकृती, २५ वनौषधी, १४ वैज्ञानिक रांगोळी, २२ मसाले, २९ आजीबाईच्या बटव्यामधील औषधे, १८ पदार्थांचा सुका मेवा, १२ विविध फुले, १९ विविध भाज्या, १८ विविध फळे आदी मांडण्यात आली होती. पालक संघ प्रतिनिधी स्वरा वळंजू यांनी इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य व शिक्षक मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेत असल्याबाबत कौतुक केले. कादर खान यांनी या प्रदर्शनातून वनौषधीचा अभ्यास करता आला. विविध प्रतिकृती दैनंदिन जीवनात किती महत्त्वाच्या आहेत हे दिसून आले, असे सांगितले. यशदा सातोसे यांनी प्रशालेच्या उपक्रमाचे कौतुक केले. स्वागत प्राचार्य मुमताज शेख यांनी केले. यावेळी मान्यवरांसह पालक, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनात दुसरी ते सातवीपर्यंतची १३६ मुले सहभागी झाली होती. प्रवेशद्वारावर आकर्षक असा सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरला. सूत्रसंचालन वैशाली शेट्टी यांनी केले.