महात्म्यांचे विचार आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्म्यांचे विचार आत्मसात करा
महात्म्यांचे विचार आत्मसात करा

महात्म्यांचे विचार आत्मसात करा

sakal_logo
By

swt3013.jpg
79180
तुळसुलीः वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना सुनील पवार. सोबत श्रीधर सावंत, मिलिंद नाईक व मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

महात्म्यांचे विचार आत्मसात करा
सुनील पवारः तुळसुली शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी भविष्यात कोण बनणार यासाठी आतापासूनच ध्येय निश्चित केले पाहिजे. थोर महात्म्यांचे विचार आत्मसात करा. छत्रपती शिवाजी महाराजांना मातोश्री जिजाऊंनी घडविले. अशांचा आदर्श जोपासताना इतिहास विसरू नका, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी तुळसुली येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषद तुळसुली चव्हाटा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुबई स्थित श्रीधर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सरपंच मिलींद नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजना वारंग, उपाध्यक्ष समृद्धी सातार्डेकर, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष उमा वेंगुर्लेकर, माता-पालक संघ उपाध्यक्ष तन्वी तुळसुलकर उपस्थित होते.  पवार म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना आपल्याला अनेक आव्हाने स्वीकारून वाटचाल करायची आहे. तुम्ही सर्व मुले देशाचे आधारस्तंभ आहात. देशाच्या जडणघडणीत तुमचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षणाचे धडे घेतानाच आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी आईवडील व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करा. आवड असेल त्याच दिशेने मार्गक्रमण करा. मुलांच्या सर्वांगीण विकासास पालकांनी प्राधान्य द्यावे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आपला जिल्हा पुनित झाला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर वाटचाल करा. शिवचरित्रासह इतर इतिहास अभ्यासा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे असून देशाला शिवभक्त मावळ्यांची गरज आहे.’’
सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परशुराम वारंग, लिंगेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य अमृतराव जगताप, नवनिर्वाचित सरपंच मिलिंद नाईक, भिकाजी जाधव, नारायण वारंग, बंड्या वारंग, प्रकाश पै, तेजस मेस्त्री, निवास सातार्डेकर, रोटरी क्लब सदस्य मकरंद नाईक, माजी सैनिक सुरेश पै, विठ्ठल वारंग आणि शरद वारंग यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. प्रास्ताविक श्रीमती स्वाती आरेकर, सूत्रसंचालन मुख्याध्यापक हरिश्चंद्र कालेलकर यांनी केले. आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती संजना वारंग यांनी मानले.