
रत्नागिरी ः शहरातील 48 मालमत्तांवर जप्तीची कारवाई
पान १
७९२२५
रत्नागिरीत ४८ मालमत्ता जप्त
करासाठी पालिका अॅक्शन मोडवर; सिव्हिल, बीएसएनएल, संचयनी बडे थकबाकीदार
रत्नागिरी, ता. ३० ः घरपट्टी वसुलीसाठी येथील पालिकेचा वसुली विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. घरपट्टी थकवणाऱ्या शहरातील ४८ मालमत्तावर पालिकेने जप्तीची कारवाई केली आहे. आतापर्यंत ६१ टक्के म्हणजे ५ कोटी ६० लाखाच्या दरम्यान वसुली झाली आहे. थकबाकीदारांमध्ये संचयनी, बीएसएनएलचे टॉवर आणि भाट्ये येथील कार्यालयाची थकबाकी ५ लाख, जिल्हा शासकीय रुग्णालयाचीही अनेक वर्षांपूर्वीची १६ लाखाची थकबाकी आहे. या कार्यालयालाही पालिकेने कारवाईची इशारा दिला आहे.वसुलीसाठी पथके सक्रिय झाली असून, फेब्रुवारीअखेर कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत.
रत्नागिरी पालिकेला कोरोना काळानंतर घरपट्टी वसुलीसाठी मोठी कसरत करावी लागली. ही वसुली सुमारे १६ कोटीच्या वर गेली होती; परंतु त्यानंतर ही वसुली करण्यात पालिकेला यश आले. २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी घरपट्टीचे उद्दिष्ट ८ कोटी १४ लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत ५ कोटी ६० लाख एवढी वसुली करण्यात वसुली पथकाला यश आले आहे. शहरामध्ये २९ हजार ०५४ एवढे इमलेधारक आहेत. त्यांच्याकडून ही घरपट्टी (कर) घेतला जातो. एकच महिना हातात असल्याने पालिकेच्या वसुली पथकाने जोरदार वसुली मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत थकबाकीदार असलेल्या ४८ मालमत्ता जप्त केल्या आहेत. वसुलीसाठी थकबाकीदारांना आगावू नोटिसा देऊनही घरपट्टी न भरणाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्याचाही प्रयोग पालिका करणार आहे तसेच घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकाद्वारेही जनजागृती अन अनेक ठिकाणी फलकही लावले आहेत.
विशेष म्हणजे थकबाकीदारांमध्ये काही खासगी संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे संचयनी या बंद पडलेल्या खासगी संस्थेच्या कार्यालयाची मोठी थकबाकी आहे तसेच बीएसएनएलचे टॉवर आणि भाट्ये येथील कार्यालयाची ५ लाखाची थकबाकी आहे. एवढेच नाही तर जिल्हा शासकीय रुग्णालयाची अनेक वर्षांची घरपट्टी थकली आहे. ही थोडी थोडकी नाही तर १६ लाख एवढी आहे. याबाबत पालिकेने रुग्णालय प्रशासनाला अवगत केले असून, कारवाईचा इशारा दिला आहे. ३ पथके वसुलीसाठी कार्यरत असून, १ फेब्रुवारीपासून वसुली विभागाची सर्व टीम मसुलीसाठी बाहेर पडणार आहे. त्यानंतर मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही. योग्य ती कारवाई केली जाईल.
दृष्टिक्षेपात
एकूण उद्दिष्ट ८ कोटी १४ लाख
वसुली ५ कोटी ६० लाख
एकूण वसुली ६१ टक्के
एकूण इमलेधारक २९ हजार ०५४
थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध
जनजागृतीसाठी पथनाट्य, फलकही