
आंगणेवाडी यात्रोत्सवात मिळणार मोबाईल नेटवर्क
आंगणेवाडी यात्रोत्सवात
मिळणार मोबाईल नेटवर्क
२५ जीओ व्हॅन, बीएसएनएलची क्षमता वाढणार
कणकवली, ता.३१ : आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना आता मोबाईल कनेक्टिव्हिटी समस्या भासणार नाही. जत्रोत्सवात जीओ कंपनीतर्फे तब्बल २५ मोबाईल व्हॅन उपलब्ध होणार आहेत. तसेच बीएसएनएल टॉवरची क्षमता देखील वाढविली जाणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे आंगणेवाडी यात्रोत्सवात मोबाईल कनेक्टिव्हिटीची समस्या सुटणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रहास सावंत यांनी दिली.
गेली अनेक वर्षे आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना मोबाईल कनेक्टिव्हिटीचा समस्या जाणवत होती. आंगणेवाडी परिसरातून मोबाईल लागत नव्हते. मात्र आता आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात येत आहे. या परिसरात नवीन जिओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहेत. तर जत्रोत्सवाच्या कालावधीत २५ जिओ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या लाखो भाविकांना यंदा ‘नो-नेटवर्क’ असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आंगणेवाडीसाठी येणाऱ्या भाविकांना यात्रेचे फोटो, व्हीडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री.सावंत यांनी दिली.